नागपूर :- आज महाराष्ट्र राज्यासाठी सोनेरी दिवस आहे. ज्या हुतात्म्यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी आहुती दिली. त्यांना आज श्रद्धांजली वाहिली पाहिजे. त्यांनी जर लढा दिला नसता तर आज महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली नसती. महाराष्ट्र राज्याला पुढे नेण्याची जबाबदारी आता आपली आहे. आपले राष्ट्र पुढे घेऊन जायचे असेल तर विचारांनी सक्षम व्हावे लागेल, असे प्रतिपादन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.१ एप्रिल ते १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ तसेच माहिती लाभार्थ्याना देण्यासाठी नागपूर विभागातील जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पर्व” हा अभिनव उपक्रम डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. या उपक्रमाचा समारोप कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपले भविष्य निश्चित करणे आवश्यक आहे. कारण आता फक्त डीग्री घेऊन उपयोग होत नाही तर आपल्यात कौशल्य असणे आवश्यक आहे. अधिक प्रगतीशील राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्याला सक्षम होणे गरजेचे आहे. असे यावेळी आयुक्तांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संबोधले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पर्व हा उपक्रम संपूर्ण नागपूर विभागात यशस्वीरित्या राबविण्यात आला. अनेक चांगले उपक्रम या माध्यमातून राबविण्यात आले असल्याचे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी प्रास्ताविकात म्हटले.
नागपूर समाज कल्याण विभागामार्फत अनेक चांगल्या योजना अतिशय उत्कृष्टपणे राबविण्यात आल्या या यशाची माहिती पुस्तिका यशोगाथा स्वरुपात प्रकाशित करण्यात आली. यावेळी डॉ. प्रशांत नारनवरे, यांचे हस्ते, प्रादेशिक उपायुक्त व त्यांचे अधिनस्त येणारे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्याचे यशोगाथाचे येथे विमोचन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त सुरेंद्र पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, सहाय्यक संचालक, वित्त व लेखा अतुल वासनिक, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, उपस्थित होते. तसेच अंजली चिवंडे, शासकीय निवासी शाळा अधिकारी, रमेश सहारकर, भगत, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आढे तर आभार प्रदर्शन सुकेशिनी तेलगोटे, यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलीमा मून, प्रशांत वासनिक, पेंदाम, दिवाकर बदन सुशिल शिंदे, निलेश बोबडे, प्रिती नुन्हारे, विजय वाकोडीकर, राजेंद्र अवधूत, सुयोग पडोळे, जितेंद्र सातपुते अधिकारी व कर्मचारी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रयत्न केले तसेच सुखदेव कौरती, समाज कल्याण अधिकारी व जयश्री धवराळ, जनसंपर्क अधिकारी यांनी सहकार्य केले.