– विद्यापीठातर्फे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
नागपूर :- विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसह आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासाशी देखील विद्यापीठाचा संबंध असतो. त्यादृष्टीने विद्यापीठाने विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा सिव्हिल लाईन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, प्रभारी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, मेळावा समितीचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर चांदेकर, सचिव डॉ. कल्पना पांडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ना.गडकरी म्हणाले, ‘कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांचा सत्कार होणे आनंदाची बाब आहे. माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग आगामी तरुणाईला झाला तर विद्यापीठ खऱ्या अर्थाने उंची गाठेल. आज ज्ञान हीच शक्ती आहे आणि विद्यापीठ ज्ञानकेंद्रीत व्हावे यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. या दृष्टीने वाटचाल झाल्यास सर्व क्षेत्रातील तंत्रज्ञान नागपुरात येईल. त्याचा सामाजिक वापर होईल. यातून विद्यापीठ खऱ्या अर्थाने ज्ञानाचे केंद्र होईल.’
नागपूर विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी जगाला आपल्या ज्ञानाने अचंबित केले आहे, त्या सर्वांना आपण शिक्षण घेतलेल्या विद्यापीठासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन त्यांच्याशी सहकार्य करार करुन विद्यापीठ जागतिक ज्ञानाचे ग्रोथइंजिन व्हावे यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही ना. गडकरी यांनी व्यक्त केली.