मोर्शी :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी म्हणून शासकीय विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा १० हजार रुपये मानधन सुरू झाले होते. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी संपण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे लाडक्या भावांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी वाढवा. अशी मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत बेरोजगार युवकाना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. त्याअंतर्गत विविध शासकीय विभागात रुजू आहेत. त्यामध्ये आपले कर्तव्य व जबाबदारी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. युवा प्रशिक्षणार्थी म्हणून हा कालावधी फक्त सहा महिने आहे. हा कालावधी फेब्रुवारी २०२५ मध्ये समाप्त होणार आहे. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार आहे. महाराष्ट्रातील विविध विभागातील हजारो पदे रिक्त असतांना प्रत्येक कार्यालयामध्ये असणाऱ्या युवकांनी चांगल्या प्रकारे कामकाज केलेले असून त्यांना संपूर्ण कामांचा अनुभव असल्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहेत, तिथेच त्यांना नियमित करण्याची अंमल बजावणी करण्यात यावी असा मुद्दा यावेळी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे रेटून धरला असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कालावधी व वेतनवाढीचा विचार करावा. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन १०० दिवस जाहीर केले व त्यामधे दीड लाख कर्मचाऱ्याची भरती करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या. अशी मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.