मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांचे मानले आभार
नागपूर :- आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्रीं आवास योजनेच्या गाळेधारकांना फक्त रु.1000/- मध्ये रजिस्ट्री लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. या करिता आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले कि, काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतील गाळेधारक माझ्याकडे आले असता त्यांनी मुद्रांक शुल्क 1000/- घेऊन रजिस्ट्री करून देण्याच्या मागणीचे निवेदन दिले. निवेदनाच्या अनुषंगाने दि.06/09/2022 रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र दिले व त्यानंतर दि.11/11/2022 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. झोपडपट्टी वासियांना मोफत रजिस्ट्री लावून दिल्या, त्याच धर्तीवर आवास योजनेच्या लाभार्थ्यांना रु.1000/- नाममात्र शुल्क घेऊन रजिस्ट्री करून देण्याची मागणी करण्यात आली. आणि आज मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा अत्यंत चांगला निर्णय घेण्यात आला. ही आनंदाची बाब आहे व आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना दिलासादायक असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.