राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती
नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळविलेले स्वराज्य हे सुराज्यात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवचरित्राचे वाचन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री संत सेवा संघ पुणे येथील विजय संजय खुटवड यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती दीक्षांत सभागृहात रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता साजरी करण्यात आली. प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात खुटवड यांनी ‘छत्रपतींची वीर कहाणी- निधान आपुल्या हर्षाचे’ या विषयावर सुंदर विवेचन केले.
महाराष्ट्रात जन्माला आलो असल्याने नव्याने शिवचरित्र काय सांगावे. भारतात आल्यावर जसे संविधान लागू पडते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील प्रत्येकाला शिवचरित्र माहित आहे असे गृहीत धरल्या जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील त्यांच्या रचनेत पंच महोत्सव सांगितले आहे. त्यातील दुसरा हा जयंती महोत्सव असून त्यात शिवाजी महाराजांची कीर्तीचे वर्णन केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची सामुदायिक प्रार्थना करण्यासाठी आपण येथे एकत्र जमलो असल्याचे खुटवड पुढे बोलताना म्हणाले.
‘अमृताला ही पैजेने जिंकू’ असे म्हणणाऱ्या संतांची, वारकऱ्यांची आपली ही दिव्य भूमी आहे. संस्कृत मध्ये असलेले महाभारत मराठीत समृद्ध करणारे ज्ञानेश्वर महाराज यांच्या ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ , अशा या संतांच्या भूमीत शिवराया जन्माला आले हे महाराष्ट्राचे भाग्यच आहे. छत्रपतींचा चरितार्थाचा विचार करताना त्यांच्या चारित्र्याचा देखील विचार व्हावा. यवनांच्या आक्रमणाखाली जनता भरडली गेली होती. स्त्रियांना उचलून नेणे, जणू माणसे गोठ्यातील जनावरेच असा हैदोस त्यांनी घातला होता. त्याकाळी त्या विरोधात बंड ही झाले. मात्र, ते अपयशी ठरले. त्याच काळात राजमाता जिजाऊंच्या तेजशीलाखेतून शिवराय जन्माला आले. त्यांनीच येथील जनतेला परतंत्र्यातून बाहेर काढले, असे खुटवड म्हणाले.
जिजाऊंनी बाल वयातच शिवबांमध्ये रामायण, महाभारत याचे बीज रोवले. ते रुजल्याने शिवाजी महाराज प्रगल्भ होत गेले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली. मात्र आपल्याला अलीकडे ‘सोळावे वरीस धोक्याचे’ असे म्हणावे लागत आहे. त्यामुळे तरुणाई कुठे चालली हे शोधण्याची गरज आहे. स्वराज्याची शपथ घेत असताना त्यांच्या समवेत १४ वर्षाचे तानाजी मालुसरे तर दुसरीकडे ६५ वर्षाचे बाजी पासलकर हे होते. यात कुठेही वयाची मर्यादा अर्थात जनरेशन गॅप नव्हती. त्यांच्याकरिता ध्येय हे सर्वश्रेष्ठ होते. समर्पणाची भावना होती. समर्पण वृत्तीने संघटन उभे राहते आणि ते ३५० वर्षानंतरही टिकते हे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेल्या त्याग व समर्पणाने दाखवून दिले असल्याचे खुटवड म्हणाले.
तोरणा गडावर सापडलेले सोन्याचे हंडे, कल्याणच्या लुटीतून आणलेली सरदाराची महिला, अफजल खानाचा वध, पन्हाळगडाचा वेढा, कोंढाण्याची चढाई, कोंढाण्याच्या लढाईत तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांचे शौर्य आदी विविध उदाहरणांमधून छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाला यावेळी उजाळा देण्यात आला. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी भारताचा अर्थ देखील समजावून सांगितला.
शिवरायांचे आठवावे रूप – डॉ संजय दुधे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाची अध्यक्षता करताना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी शिवरायांचे आठवावे रूप- आठवावा प्रताप असे मार्गदर्शन केले. कल्याणकारी रयतेचे राजे असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था, संरक्षण तसेच कुटुंब व्यवस्था त्यांच्या स्वराज्यात निर्माण केल्याची माहिती दुधे यांनी दिली. राजा बडे लिखित राज्य गीत तसेच विद्यापीठ गीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. अतिथींनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्र-कलगुरु डॉ. संजय दुधे यांनी व्याख्याता विजय खुटवड यांचा ग्रामगीता स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी मानले. दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिष्ठाता, शिक्षक, विद्यापीठाचे अधिकारी तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.