– लोहमार्ग पोलिस, आरपीएफची रंगीत तालिम
नागपूर :- लोहमार्ग पोलिसांना आरडीएक्स आणि अग्निशस्त्र असलेली बॅग सफाई मशिनजवळ आढळली. या संशयित बॅगमुळे प्रचंड खळबळ उडाली. दहशतवादी कारवाईची शक्यता वर्तवून आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस पथकाची प्रचंड धावपळ उडाली. काही वेळातच बॅग ताब्यात घेण्यात आली.
अयोद्येतील मंदिरात 22 जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि 26 जानेवारी प्रजासत्ता दिनाच्या पृष्ठभ्ाूमीवर रेल्वे स्थानकाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. प्रवाशांच्या गर्दीत अनुचित प्रकार घडू नये तसेच खबरदारीची उपायोजना म्हणून लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी रंगीत तालिम घेतली.
सर्व पोलिस यंत्रणांनी अॅक्शन मोडमध्ये येऊन एका तासात दहशतवाद्यांचा सामना करून त्यांना अटक केली.
लोहमार्ग पोलिस पेट्रोलिंग करीत असताना रेल्वे स्थानकातील गार्ड लाईन लॉबी परिसरातील सफाई मशिनजवळ एक बॅग आढळले. बॅगमध्ये आरडीएक्स आणि अग्निशस्त्र असल्याचा थरार निर्माण करण्यात आला. या रंगीत तालमेत रेल्वे स्टेशन प्रबंधक अतुल श्रीवास्तव, लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनिषा काशीद, दहशतवादी विरोधी पथक, आरपीएफचे बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, अग्निशमन व रेल्वे रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा आदी एकूण 15 अधिकारी आणि 62 कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. रंगीत तालीम दुपारी 4.15 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5.50 वाजता संपली. परिस्थिती हाताळताना काय चुका झाल्या पुन्हा ती कशी हाताळावी याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी सहभागी कर्मचार्यांना दिली. या रंगीत तालीमच्या थरारामुळे रेल्वे स्थानकावरील उपस्थित प्रावशांमध्ये एकच खळबळ माजली. या दरम्यान काय हाय हालचाली होत प्रवाशांना कळत नव्हते. लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात मॉक ड्रील यशस्वीरीत्या पार पडली.