– किशोर तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ठाकरे गटातील काही वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर ‘मातोश्री’ आणि ‘सेना भवन’ ताब्यात घेण्याचा आरोप केला
नागपूर :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. निवडणुकीत अपेक्षेपेक्षा खराब कामगिरीनंतर पक्षातील अंतर्गत मतभेद तीव्र झाले आहेत. काही नेते खुलेआम पक्ष नेतृत्वावर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपले प्रवक्ते किशोर तिवारी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उद्धव ठाकरेंनी कालच आपण ‘धक्कापुरुष’ झाल्याचं मिश्कील वक्तव्य केलं होतं.
काय आहे प्रकरण?
किशोर तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ठाकरे गटातील काही वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर ‘मातोश्री’ आणि ‘सेना भवन’ ताब्यात घेण्याचा आरोप केला. तसेच, जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप करत या नेत्यांना विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.
किशोर तिवारींची हकालपट्टी
या वक्तव्यानंतर पक्षाने त्वरित कारवाई करत तिवारी यांना प्रवक्तेपदावरून काढून टाकले आणि त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती देण्यात आली.
ठाकरे गटात अस्वस्थता
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अस्वस्थता जाणवत आहे. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. काही नेते पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत आहेत, तर काहींनी थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पक्ष अधिक अडचणीत सापडला आहे.
अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
किशोर तिवारी यांच्या हकालपट्टीमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी अधिकच चव्हाट्यावर आली आहे. पक्षाच्या भविष्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, आगामी काळात शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना आता पक्षातील असंतोषावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलावी लागतील, अन्यथा पक्षासमोर आणखी आव्हाने निर्माण होऊ शकतात.