रातुम नागपूर विद्यापीठ ते झिरो माईल मार्ग ‘स्‍व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ नावाने ओळखला जाणार – ना. नितीन गडकरी

– भूयारी मार्गाला देखील दत्ताजींचे नाव : २०० कोटींच्या नवीन प्रकल्पांची घोषणा

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते झिरो माईल फ्रीडम पार्क मार्ग ‘स्व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ या नावाने ओळखला जाणार आहे. दत्ताजी डिडोळकरांचे कार्य आणि त्यांचे आदर्श हे जनहिताची कामे करण्याची प्रेरणा देत राहिल, अशी भावना व्यक्त करीत स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह आयोजन समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘स्व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ नामकरण झाल्याचे जाहिर केले.

नागपूर महानगरपालिकेद्वारे शनिवारी (ता.१४) झिरो माईल मेट्रो स्टेशन जवळ आयोजित ‘स्व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ नामकरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह आयोजन समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.

कार्यक्रमाला अतिथी म्हणून आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. रामदास आंबटकर, वर्धाचे आमदार डॉ. पंकज भोयर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त सुनील लहाने, स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह आयोजन समितीचे सहसचिव अरुण लखानी, सचिव माजी खासदार अजय संचेती, सुनील पाळधीकर, जयंत पाठक, माजी आमदार प्रा. अनिल सोले, डॉ. मिलींद माने, माजी महापौर दयाशंकर तिवारी, दत्ताजी डिडोळकर यांच्या कुटुंबातील विजय डिडोळकर, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता  विजय गुरूबक्षाणी, महा मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे,  राजीव त्यागी, डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी नगरसेवक सर्वश्री संजय बंगाले, सुनील हिरणवार, संदीप जाधव, सुनील अग्रवाल, किशोर वानखेडे, निशांत गांधी, माजी नगरसेविका उज्ज्वला शर्मा, श्रद्धा पाठक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या म्यूरलचे लोकार्पण करण्यात आले. पुढे बोलताना ना.नितीन गडकरी यांनी दत्ताजी डिडोळकर यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा उहापोह केला. दत्ताजी डिडोळकर अजातशत्रू होते. आपल्या आयुष्यात त्यांनी हजारो लोकांच्या अडचणीच्या काळात धावून जात मदत केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान होते. परिषदेच्या माध्यमातून विद्यापीठामध्ये विद्यार्थी हिताचे महत्वाचे निर्णय आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यात त्यांची भूमिका मार्गदर्शक होती. त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते झिरो माईल फ्रीडम पार्क मार्गाला ‘स्व. दत्ताजी डिडोळकर’ यांचे नाव देणे हा आनंदाचा क्षण असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

मानस चौक ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पर्यंत भूयारी मार्ग निर्माण करण्यात येत असून या मार्गाच्या कार्याचे देखील केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते झिरो माईल फ्रीडम पार्क मार्गासोबतच भूयारी मार्गाला देखील ‘स्व. दत्ताजी डिडोळकर’ यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी ना. नितीन गडकरी यांनी केली. यासोबतच त्यांनी केंद्रीय रस्ते निधीतून नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये २०० कोटींच्या नवीन प्रकल्पांची देखील घोषणा यावेळी केली.

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे म्युरल तयार करणारे कलावंत संजय गर्जलवार यांच्या सत्कार करण्यात आला. याशिवाय स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या कुटुंबातील सदस्य विजय डिडोळकर, प्रज्ञा डिडोळकर, सुरेश डिडोळकर, विद्या डिडोळकर आदी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक जयंत पाठक यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी केले व आभार मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पात्र लाभार्थ्यांनी ‘आयुष्मान भारत कार्ड’ काढावे - जिल्हाधिकारी

Sat Oct 14 , 2023
– घोराड व वारोडा गावाला भेट ; प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली नागपूर :-  जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज केले. तसेच, आयुष्मान भारत कार्डपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये, अशा सूचना शासकीय यंत्रणेला दिल्या. त्यांनी आज कळमेश्वर तालुक्यातील घोराड आणि वारोडा गावाला भेट देऊन आयुष्मान भारत कार्ड संदर्भातील स्थिती जाणून घेतली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com