रामटेक तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द – सुनील केदार

-चार कोटी साडेआठ लाख रुपये कामांचे भूमीपूजन

नागपूर : रामटेक तालुका आदिवासी बहुल असून कोवीड महामारीमुळे तालुक्यातील विकास कामांना खंड पडला होता. आता त्यांना गती देऊन विकासाची गंगा आणण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. त्यासोबतच शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजना पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायास चालना देण्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे आयोजित कामगार सुरक्षकांना साहित्य वाटप तसेच जि.प.च्या वतीने नगरधन-भांडारबोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील 4 कोटी 8 लाख 50 हजार रुपयांच्या कामांचे भूमीपूजन श्री. केदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, रामटेक पंचायत समितीच्या सभापती कला ठाकरे, पारशिवनीच्या सभापती मिना कावळे, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, पंचायत समिती सदस्य अश्विनी हिरणवार, नगरधनचे सरपंच प्रशांत कामडी यावेळी उपस्थित होते.
शासकीय योजना गोरगरीबांच्या घरी पोहचल्या पाहिजेत यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. राशनकार्ड असूनही ज्यांना राशन मिळत नाही अशा व्यक्तींसंदर्भात प्रस्ताव तयार करावा, त्यास शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल, असेही श्री. केदार म्हणाले.
आदिवासीबहुल तालुका असल्याने आदिवासी विकासाच्या योजना राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रामटेक तालुक्याच्या विकासावर जास्तीत जास्त भर देऊन कृषी, पशुसंवर्धन,आरोग्य,शिक्षण आदी क्षेत्रातील विकासास प्रामुख्याने चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड महामारीच्या काळात कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा परिषदेने पहिल्यांदाच 38 रुग्णवाहिका ग्रामीण क्षेत्रात आरोग्याच्या सेवा सुदृढ होण्यासाठी देण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ ग्रामीण जनतेला होईल, असेही ते म्हणाले.
नगरधन येथील पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेला वाकाटक कालीन किल्ला बाहेरुन दुरुस्त करण्यात आला परंतु आतून सोयी सुविधा झाल्या नाहीत. त्याबाबत प्रस्ताव तयार करा, त्यास शासनावर पाठपुरावा करण्यात येईल, असे पाहणी दरम्यान त्यांनी सांगितले.
कामगारांना बांधकाम साहित्य देवून कामगार मंडळातर्फे मदतीचा हात दिला आहे. त्यासोबतच घरकुलाचा लाभही या तालुक्याला मिळाला आहे, तसेच दिव्यांगाच्या योजनाबाबत लवकरच तालुकास्तरावर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबीर घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी सांगितले. जनतेस जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचेही भाषण झाले.
प्रारंभी रामटेक पंचायत समिती येथे आढावा बैठक घेवून श्री.केदार यांनी अधिकाऱ्यांनी कामांना गती देण्याच्या सूचना केल्या. आजनी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्याचे भूमीपूजन त्यांनी केले.
हमलापुरी येथे मदर डेअरी सुरु
हमलापुरी येथील मदर डेअरीचा प्रारंभ श्री. केदार यांनी केला. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, मदरडे अरीचे सतीश राजू, कृषी सभापती तापेश्वर वैद्य तसेच मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात दूध साठवणूकीचे तीन केंद्र असून त्यापैकी हमलापुरी येथे एक आहे. यामुळे रामटेक, पारशिवनी व मौदा येथील पशुपालकांना दुधाचे विक्री करण्यास सोयीचे होईल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हातभार लागणार असून बेरोजगारी कमी करण्यास मदतच होणारआहे. मागणी व पुरवठा यामध्ये समतोल राखल्यास पशुपालकांना याचा जास्त फायदा होणार असल्याचे श्री. केदार म्हणाले.
यानंतर काथुरवाही येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्याचे भूमीपूजन त्यांनी केले. मौजा दहेगाव येथील पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन तसेच मौजा करंभाड येथील जि. प.च्या निधीतून वर्गखोल्याचे भूमीपूजन त्यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोराडी वीज केंद्राचे कंत्राटी कामगार वैतागले

Mon Jan 17 , 2022
-काम बंद आंदोलन करण्याचा इशारा -राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर यांना मागितला पाठिंबा -करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला प्रतिसाद म्हणून सर्व कामगारांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत नागपूर – महानिर्मिती ३x६६० कोराडी वीज केंद्राच्या राख हाताळणी विभागातील कंत्राटी कामगारांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर (ग्रा.) यांच्या माध्यमातून वारंवार मुख्य अभियंता प्रकाश खंडारे व कोराडी वीज प्रशासनाला कामगारांच्या समस्यांबाबत तक्रार पत्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!