– १८ उमेदवारांचा निर्णय पेटीबंद
– पोलिसांचा तगडा बंदोबस्त
– समर्थ शाळेत शांततेत पार पडली मतदान प्रक्रिया
रामटेक :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणुक प्रक्रीया आज दि. २८ एप्रील ला येथील समर्थ विद्यालय रामटेक येथे तगड्या पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली.
कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे एकुण १८ संचालकांची बॉडी आहे. त्यासाठी ठरल्याप्रमाणे आज दि. २८ एप्रील रोजी शहरातील समर्थ विद्यालय रामटेक येथे निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पडली. १८ संचालक पदांसाठी मतदान झाले. मतदारांमध्ये सेवा संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी व अडतीया तथा हमाल मापाडी अशा एकुण १०५६ मतदारांचा समावेश होता. दरम्यान सकाळी ८ ते १० पर्यंत १९.६० %, सकाळी १० ते १२ पर्यंत ४८.२० % , दुपारी १२ ते २ पर्यंत ८४.०२ % तर दुपारी २ ते ४ पर्यंत ९४.८९ % मतदान झालेले होते. मतदान प्रक्रियेवेळी मतदान केंद्रावर पोलीस निरीक्षक यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे हे आपल्या पोलीस पथकासह तैनात होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे तथा कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन मतदान केंद्रावर करण्यात आल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकार्यांनी दिली.
काही उमेदवारात नाराजीचा सुर
मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राच्या बाहेर उभ्या असलेल्या उमेदवारांशी वार्तालाभ केला असता काही उमेदवारांमध्ये ‘ आमच्या साहेबांनी पुर्ण सहकार्य केले असते तर आमचे पद पक्के होते ‘ असे बोलत नाराजी व्यक्त केली.