संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नगर परिषद प्रभाग क्रमांक 15 रमाई नगर नवीन कामठी येथील पाणी समस्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कामठी नगर परिषद कार्यालयासमोर प्रशासनाविरोधात तीव्र नारे बाजी करून मडकाफोड आंदोलन केले भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामठी नगर परिषद प्रभाग क्रमांक 15 रेल्वे लाईन जवळ नवीन कामठी येथे 60 ते 70 कुटुंब वास्तव्यास असून या परिसरात नगर परिषदेच्या वतीने पाणी पाईपलाईन नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असते पाणी समस्येसाठी नागरिकांनी माजी नगरसेविका संध्या रायबोले ,कामठी शहर भाजपचे माजी महामंत्री उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वात दहा ते पंधरा वेळा निवेदन मुख्याधिकारी,नगरपरिषद प्रशासन, तहसीलदार, महसूल विभागीय अधिकारी यांना दिली परंतु प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही नेहमीच निवेदनाला नगरपरिषद प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक पाण्यासाठी वण वण भटकत आहेत रमाई नगरातील पाणी समस्येसाठी भाजपचे वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे कामठी नगर परिषद कार्यालयासमोर शहर भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर तुपट ,भाजपचे माजी महामंत्री उज्वल रायबोले ,शंकर चवरे ,ऋषी दहाट , संघरक्षित साखरे, अनिकेत शेंडे यांच्या नेतृत्वात पाणी समस्येसाठी नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र नारे निदर्शने करून मटका फोडून आंदोलन केले चार दिवसाच्या आत रमाई नगरातील पाणी समस्या न सोडविल्यास मुख्य अधिकाऱ्याला साडी, चोळी व बांगड्याच्या आहेर देणार असल्याचे भाजपचे माजी महामंत्री उज्वल रायबोले यांनी सांगितले आहे आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नवीन कामठी पोलिसांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.