यवतमाळ :- जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व क्रीडा भारती सायकलिंग ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार, क्रिडा भारती सायकलिंग ग्रुपचे अध्यक्ष दिलीप राखे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून अभ्यंकर कन्या शाळेचे उपमुख्याध्यापक अविनाश जोशी होते.
सदर रॅली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय येथून एसबीआय चौक, अप्सरा टॉकीज चौक, हनुमान आखाडा, पाच कंदील चौक, पोलिस स्टेशन अवधुतवाडी, सारस्वत चौक, दवा बाजार, दत्त चौक, संविधान चौक, एलआयसी चौक, तिरंगा चौक, करवा मेडीकल असे मार्गक्रमण करीत जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ येथे विसर्जीत झाली.
रॅलीनंतर सायकल रॅली संदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये उपमुख्याध्यापक अविनाश जोशी यांनी सायकलचे महत्व याबाबत विस्तृत माहिती दिली. वातावरणामध्ये होणारे प्रदुषण सायकल चालविल्यामुळे कमी होते, असे ते म्हणाले.
कार्यकमाचे उद्घाटक व अध्यक्ष एस.आर. शर्मा यांनी पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकल चालविणे खुप गरजेचे असल्याने सांगितले. तसेच सायकल चालविण्याबाबतचे फायदे याची माहिती दिली. सायकलमुळे माणुस तणावमुक्त होतो, असे यावेळी आपले अध्यक्षीय मनोगतात सांगितले.
रॅलीमध्ये येथील न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, न्यायालयीन कर्मचारी, अभ्यंकर कन्या शाळेचे विद्यार्थी, अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच सावित्रीबाई समाजकार्य व महात्मा जोतीबा फुले समाजकार्यचे पॅरा विधी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार उमेश मस्के यांनी केले.