– राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ
नागपूर :- राजमाता जिजाऊ युवती स्वसरंक्षण प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शाळकरी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळणार असून मुलींना धाडसी बनविण्यात हा उपक्रम महत्वाचा ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी व्यक्त केला. महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे उद्घाटन आज तिडके विद्यालय येथे करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य मीनल समर्थ, जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे, संरक्षण अधिकारी मंजुषा रहाणे, सायबर सेलचे सहपोलिस निरिक्षक निशिकांत जुनोनकर, हेमलता ढवळे भारतीय स्त्रीशक्तीच्या समुपदेशिका रेखा देवधर, विद्यार्थी निधी ट्रस्टच्या विजया चिखलकर, यांची उपस्थित होत्या.
कोल्हे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यातील युवतींना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवतींना मोफत प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
रेखा देवधर म्हणाल्या की, मागील काही दिवसांमध्ये महिलावरील अत्याचाऱ्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाळकरी व महाविद्यालयीन तरूण- तरूणी यांची जीवनशैली तंत्रज्ञानामुळे बदलली आहे. त्यातून सामाजिक समस्या निर्माण होत आहे.
यावेळी पोलीस निरिक्षक निशिकांत जुनोनकर यांनी उपस्थितांना सायबर सेल या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत बोंडे यांनी केले तर आभार मंजुषा रहाणे यांनी मानले.