राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी 199 कोटींची निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील इंदूमिल येथील स्मारक जगाला हेवा वाटेल असे करणार

कोल्हापूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडन मधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे, त्याचीच प्रतिकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एैतिहासिक परिषद माणगाव येथेच झाली होती. या दोघांचे संयुक्त स्मारक माणगाव येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी 199 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

माणगाव येथील माणगाव परिषदेच्या 15 ठरावांच्या शिलालेखाचे उद्घाटन, होलाग्राफिक शो व माणगाव येथे साकारलेल्या लंडन हाऊस प्रतिकृती इमारत लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलीक, आमदार राजूबाबा आवळे, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के.मंजुलक्षी, माणगावचे सरपंच राजू मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव येथील संयुक्त स्मारकाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील इंदू मिल येथील स्मारकही संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीने करणार आहे. राजर्षी शाहू महाराज महान समाजसुधारक होते. शिक्षणात आणि नोकरी मध्ये बहुजनांना आरक्षण देणारे व शिक्षणासाठी वसतिगृहाची उभारणी करणारे ते पहिले राजे होते. तर बहिष्कृत समाजाला स्वाभिमानाची आणि स्वत:ची जाणीव करुन त्यांचा उध्दार करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ. आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या उपस्थितीत जगातील पहिली बहिष्कृत वर्गाची एैतिहासिक माणगाव परिषद घेतली त्यामुळे ही पावन भूमी आहे. या भूमीला मी वंदन करतो, असे  शिंदे म्हणाले.

माणगाव या ठिकाणी साकारण्यात आलेला होलोग्राफिक शो पाहताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष आपल्याशी बोलत आहेत असे दुर्मिळ क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळत आहेत, हे आपल्या सर्वांचे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासनही गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कल्याणकारी योजना सुरु आहेत. यामधून कष्टकरी, कामगार,महिला, तरुण युवा वर्गासह सर्वांनाच विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबध्द आहे. बार्टी, सारथी, महाज्योती, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था सक्षमपणे समाजाच्या उध्दारासाठी काम करीत आहे. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला दिन व महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्र आणि राज्य शासनाद्वारे महिला विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sat Mar 9 , 2024
– शालेय विद्यार्थीनींना सायकल आणि स्कुल किटचे वितरण नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला विकसित बनविण्याचे उद्दिष्टय पूर्ण करण्यासाठी देशातील 50 टक्के महिलांना मानवसंसाधन क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचा संदेश दिला आहे. याच दिशेने केंद्र आणि राज्य सरकार महिला विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. जागतिक महिला दिनाच्या औचीत्याने जुना सुभेदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com