मुंबई, दि.३ – अँड राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त करून विधानसभेच्या अध्यक्षपदी अँड राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडला आणि त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
आज विधानसभेच्या विशेष आधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली.या वर अभिनंदनाचा प्रस्ताव माडतांना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या विधिमंडळाला मोठी परंपरा आहे. ज्यांनी ज्यांनी या अध्यक्ष पदावर कार्य केले आहे. त्यांना देशपातळीवर नावाजले गेले आहे म्हणून विधिमंडळात कायमच अध्यक्षांना एक वेगळं महत्व आणि मान राहिलेला आहे. तीच धुरा खांद्यावर पुढे घेऊन चालण्याची जबाबदारी आता अँड राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर आलेली आहे. ती नक्कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील आणि सभागृहाची प्रतिष्ठा उंचाविण्याचे कार्य करतील.
हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या सभागृहात शेतकरी बांधव,महिला, सामान्य नागरीक यांचे हक्क ,अधिकार जोपासले जातील. जनतेच्या विकासासाठी काम करताना दोन्ही चाक समांतर सुरू राहतील. कायद्यासमोर सर्व समान म्हणून आपण कार्य करावे. हे सरकार पारदर्शक पणे कार्य करेल सभागृहात सदस्यांवर अन्याय होऊ नये, वेळप्रसंगी समज देऊन योग्य मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले
ॲड. राहुल नार्वेकर हे राज्यातील आणि देशातील सर्वात तरूण अध्यक्ष आहेत.राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा पुरस्कार प्राप्त ॲड नार्वेकर हे कायद्यात निष्णात असल्याने या पदावरून न्यायदानाचे काम करतील.यापूर्वीच्या सर्व अध्यक्षांनी उत्तम काम केले आहे, हीच परंपरा ॲड नार्वेकर यांच्या कालावधीत पुढे सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या सर्व नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची संधी त्यांना मिळाली आहे. न्यायालयाच्या कसोटीवर विधिमंडळाचे कायदे टाकावेत असे परिपूर्ण असले पाहिजे. कोणत्याही अडचणी, प्रश्न सोडविण्याची क्षमता या सभागृहात आहे. त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेऊन त्या विषयाला न्याय देण्याचे कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करून अँड राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी
या पदाला गौरवशाली परंपरा आहे, ती कायम ठेवत ॲड नार्वेकर यांच्या कार्यकाळात लोकहिताचे निर्णय घेऊन राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ॲड नार्वेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही ॲड नार्वेकर यांना शुभेच्छा देऊन सभागृहात राज्याच्या सर्व प्रश्नांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
याचबरोबर सुनील प्रभू, अबू आझमी, बच्चू कडू, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, नाना पटोले, आदित्य ठाकरे, दीपक केसरकर, हरिभाऊ बागडे, किशोर जोरगेवार, धनंजय मुंडे आदी सदस्यांनीही ॲड नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.