– सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी होणार धनादेशाचे वितरण
मुंबई :- दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य अनुदान योजनेतर्गत तब्बल ८९ मराठी चित्रपटांना धनादेश वितरण करण्यात येणार आहे. शुक्रवार, २० ऑक्टोबर २०२३ रोजी, सायंकाळी ६ वाजता, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेश वितरण कार्यक्रम होणार आहे.
फेब्रुवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत एकूण १७४ चित्रपट परीक्षण करण्यात आले आहेत. त्यापैकी ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपट ३७, ‘ब’ दर्जा प्राप्त चित्रपट ४८, राज्य-राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट ०४ असे एकूण ८९ चित्रपटांना अनुदान वितरण करण्यात येणार आहे. यासाठी एकूण २९ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी वितरीत होणार आहे.
राज्य शासनाने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना कार्यान्वित केली आहे. त्यात कालानुरूप बदल करून सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येते.
दर्जेदार चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेनुसार “अ” दर्जा प्राप्त चित्रपटांकरिता ४० लाख रुपये इतके अनुदान आणि “ब” प्राप्त चित्रपटांकरता ३० रुपये लाख इतके अनुदान मंजूर करण्यात येते. परिक्षणाअंती ज्या चित्रपटांना ७१ च्या पुढे गुण असतील त्यांना “अ” दर्जा, व ५१ ते ७० गुण असणाऱ्या चित्रपटांना “ब” दर्जा देण्यात येतो.
महाराष्ट्र राज्य पुरस्कार / राष्ट्रीय पुरस्कार / आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना कोणत्याही परीक्षणाशिवाय “अ” दर्जा देण्यात येतो. मात्र यासाठी चित्रपट प्रदर्शनासंबंधीच्या अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी एकूण २८ सदस्यांची चित्रपट परिक्षण समिती गठीत करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘दशक्रिया’, ‘बार्डो’ आणि ‘फनरल’ आणि राज्य पुरस्कार प्राप्त चित्रपट ‘तेंडल्या’ यांना अनुदान मिळणार आहे.