– आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली नव्या “क्यू आर कोड” प्रणालीची पाहणी
नागपूर :- शहरातील उद्यानांची माहिती मिळावी व उद्यानासंदर्भात तक्रार थेट मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचविता यावी, या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. नागपूर महानगरपालिका तर्फे शहरातील २६ मोठ्या उद्यानात “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम”लावण्यात आले आहे. मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (१६) रोजी पूर्व नागपुरातील भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे याची पाहणी केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल सुद्धा उपस्थित होत्या. आता नागपूरकर उद्यानात बसून त्याच उद्यानाची माहिती आणि उद्यान विकास संदर्भात आपला अभिप्राय एक एक क्यू आर कोड स्कॅन करून थेट महानगरपालिकेच्या उद्यान विभागात नोंदवू शकतात.
मनपा आयुक्त डॉ चौधरी यांचा मार्गदर्शनात उद्यान विभागातर्फे शहरातील मेजर सुरेंद्र देव पार्क (धंतोली), सुर्वेनगर उद्यान, राजीव गांधी उद्यान, त्रिमूर्तीनगर, सावरकर नगर, ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार ट्रॅफिकपार्क उद्यान, शिवाजीनगर उद्यान, दगडी पार्क, जागृत कॉलोनी खेळाचे मैदान, के टी नगर नक्षत्र नगर उद्यान, महात्मा गांधी उद्यान हनुमान नगर, बालभवन उद्यान, गांधीसागर तलाव, सुभाष रोड,महात्मा फुले उद्यान, सुयोग्य नगर, त्रिशताब्दी उद्यान, जुना नंदनवन, संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यान, दत्तात्रयनगर, संत तुकाराम उद्यान सक्करदरा, महावीर उद्यान अजामशाह लेआऊट, जुना बगडगंज उद्यान, गांधीबाग उद्यान, तुलसीनगर उद्यान, भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान, लता मंगेशकर उद्यान, सूर्यनगर, स्वतंत्र स्वराज जयंती उद्यान देशपांडे लेआऊट, डॉ बाबासाहेब उद्यान वैशाली नगर, ॲड. सखारामपंत मेश्राम उद्यान (मंगळवारी) दयानंद पार्क जरीपटका येथे “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम” लावण्यात आली आहे. आयुक्त श्री चौधरी यांनी नागरिकांना या सिस्टीमचा वापर करून आपले अभिप्राय नोंद करण्याचे आवाहन केले आहे.
आयटी विभागाचे स्वप्निल लोखंडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना संपूर्ण प्रणालीचे कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. या अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या २६ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश द्वार, उद्यानातील बसण्याचे ठिकाण, मुलांचे क्रीडांगण, बाहेर जाण्याचा मार्ग अशा जवळपास चार ते पाच दर्शनीय जागेवर “क्यू आर कोड” लावण्यात येणार आहेत. हा कोड मोबाईलवर स्कॅनकरून नागरिक उद्यानाची माहिती, त्यासंदर्भाती तक्रारी, विकासासाठीचे अभिप्राय थेट मनपाच्या उद्यान विभाग, आयटी विभाग, उद्यानातील संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो.
मनपा आयुक्तांनी भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मनपा तर्फे फार वर्षापूर्वी बांधण्यात आलेली वास्तूचे सुद्धा निरीक्षण केले. सध्याच्या या वस्तूचा उपयोग होत नाही. या वास्तूच्या दुरुस्ती आणि रंग रंगोटी करून त्याला नवीनरूप देण्याचा निर्देश आयुक्तांनी दिले. त्यांनी उद्यानाचे मेन्टेनन्स बद्दल प्रशंसा केली आणि नागरिकांसाठी कचरा पेटी लावणे, खेळण्याचे उपकरणची दुरुस्ती करणे इत्यादी निर्देश दिले. या प्रसंगी उपायुक्त डॉ रंजना लाडे, आई टी विभागाचे संचालक महेश धामेचा, सहायक आयुक्त गणेश राठोड, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, कार्यकारी अभियंता संजय माटे, आणि माजी नगरसेवक बाल्या बोरकर उपस्थित होते.
“क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम असे करेल काय..
मनापाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर मनपा क्षेत्रातील २६ उद्यानात लावण्यात आली आहे. याद्वारे नागरिक मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून उद्यानाचे परिसर, उद्यानात असणारे विविध वृक्ष, फूल, उद्यानात दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा, प्रसाधनगृह आदी विषयी माहिती मिळवू शकतात, तसेच उद्यानासंदर्भातील तक्रार देखील करू शकतात. नागरिकांनी केलेली तक्रार एसएमएसद्वारे तक्रारकर्ता, उद्यान विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यत पोहोचेल व समस्याचे निराकरण त्वरित करता येईल.