यवतमाळ :- येथील पत्रकार नितीन पखाले यांनी शालेय व कुमारवयीन मुलांसाठी लिहिलेल्या ‘डेबू ते गाडगेबाबा- विवेकाच्या वाटेवरील लोकशिक्षक’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, १७ जानेवारी रोजी पुणे ‘रावण’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक शरद तांदळे व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसच्या संचालक अमृता तांदळे यांच्या हस्ते झाले. यावेळी लेखक नितीन पखाले, संपादक अनिल माने, युवा लेखक प्रणित पवार, प्रिंयका सरवार आदी उपस्थित होते.
आजची पिढी मोबाईल आणि तंत्रज्ञानात व्यस्त राहत असताना समाजासाठी वाहून घेतलेल्या क्रांतीकारी अशा थोर व्यक्तींचे चरित्र शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. ‘डेबू ते गाडगेबाबा’सारखे चरित्रात्मक पुस्तक पालकांनी स्वत: वाचणे व मुलांना वाचायला देणे आवश्यक आहे, असे मत यावेळी बोलताना लेखक शरद तांदळे यांनी व्यक्त केले. मुलांना समजेल अशा सहज, सोप्या भाषेत या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने गाडगेबाबांचा एक वेगळा पैलू उलगडला, असे कौतुकोद्गार अमृता तांदळे यांनी काढले. विदर्भातील संतांची चरित्रमालिका काढण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या पुस्तकाच्या लिखाणाच्या निमित्ताने किशोरवयीन मुलांपर्यंत गाडगेबाबांचे विचार, मूल्य आणि प्रबोधान कार्य पोहचविण्याची संधी मिळाल्याची भावना यावेळी लेखक नितीन पखाले यांनी व्यक्त केली. नितीन पखाले यांनी विविध वृत्तपत्रांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, कार्यकारी संपादक अशा पदावंर कार्य केले आहे. यापूर्वी त्यांनी विविध वृत्तपत्रांत केलेल्या स्फूट लेखणाचे ‘जस्ट डू इट’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.