नागपूर :- प्लास्टिक पिशव्यांचा वापर हा लोकांच्या वापराचा अविभाज्य भाग झालेला आहे. प्लास्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम व परिसरात पसरणारी अस्वच्छता याचे सर्वांना भान असणे अत्यंत आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिका आयईसी चमू यांच्या मदतीने ‘प्लास्टिक राक्षस’ तयार करून विविध ठिकाणी ‘प्लास्टिक बंदी’ या विषयावर जनजागृती करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात प्लास्टिक बंदी-कचरामुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या आयईसी चमूद्वारे प्रभाग २० अंतर्गत इतवारी भाजी बाजार येथे प्लास्टिक बंदी या विषयावर जनजागृती करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक राक्षस तयार करण्यात आला होता. सर्व दुकानदार आणि नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिकमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबद्दल माहिती देण्यात आली. तसेच कापडी पिशव्या व ज्यूट पिशव्या वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, झोनल अधिकारी डॉ. राजीव राजूरकर उपस्थित होते.
प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असून देखील त्याचा वापर लहान-मोठे व्यापारी, भाजी विक्रेते आणि दुकानदार करत आहेत. ग्राहकांकडून देखील प्लास्टिक पिशवीची मागणी केली जाते. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक राक्षसच्या मदतीने प्लास्टिक किती घातक आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांना कापडी पिशवीचे उपयोग समजावून सांगण्यात आला. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे काही तासांची सोय होत असली तरी त्याचे दूरगामी गंभीर दुष्परिणाम आपल्या सर्वांसाठी, वन्यजीवांसाठी, जलस्रोतांसाठी खूपच धोकादायक आहेत, हे नागरिकांना पटवून देण्यात आले.
प्लास्टिकचा कचरा आरोग्यासाठी खूप घातक आहे. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होतात. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्टी करता येतात. सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, न थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. घरातील व सोसायटीतील कचऱ्याची योग्य त्या ठिकाणी ओला – सुका वर्गीकरण करून विल्हेवाट लावली गेली पाहिजे. जमेल तशी व तेव्हा परिसराची स्वच्छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्यासाठी प्रवृत्त करायला हवे. यासाठी आपला सर्वाचाच सहभाग अत्यंत मोलाचा आहे, असा संदेश जनजागृती देण्यात आला.