पुणे :- जलशक्ती मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जल जीवन मिशन व गाळयुक्त शिवार इत्यादी शासनाच्या विविध योजनांची जलरथामार्फत प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत असून या जलरथाला जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी जिल्हा परिषद येथे हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा शुभारंभ केला.
यावेळी जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक आप्पासाहेब गुजर, भारतीय जैन संघटनेचे समन्वयक नितीन शहा व त्याची संपूर्ण टिम व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जलरथ जिल्ह्यातील एकूण १ हजार ३८५ ग्रामपंचायतीमध्ये भेट देणार आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये एकूण १ हजार ८४३ गवांपैकी १ हजार ४०१ गावे स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत हागणदारी मुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात आली असून मार्च २०२४ अखेर सर्व म्हणजे १ हजार ८४३ गावे हागणदारी मुक्त घोषीत करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.
जिल्ह्यांतील १३ तालुक्यांतील सर्व १ हजार ८४३ गावांत जलरथामार्फत योजनांची माहिती देण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात एक चित्ररथ फिरणार आहे, अशी माहिती गुजर यानी दिली.