नागपूर :- नागपूर येथील व्हीएनआयटी शाखा कार्यालय भागातील रहिवासी ऋषी अशोक उधोजी यांनी महावितरणकडे नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केला आणि आणि सर्व प्रक्रीया तत्परतेने पुर्ण करीत महावितरणने त्याच दिवशी सायंकाळपर्यंत त्यांना नवीन वीज जोडणी दिली. महावितरणच्या या तत्परतेने त्यांनी आभार व्यक्त करताना महावितरणचे आभार मानले आहे. ऋषी अशोक उधोजी न्यांचेसह कळमेश्वर शाखा कार्यालयाअंतर्गत सावंगी येथील रवीशंकर पंचेश्वर यांना देखील वीज जोडणीसाठी अर्ज केल्याच्या दिवशी नवीन वीज जोडणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या मोहीमे अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील अनेक वीज ग्राहकांना त्वरीत नवीन वीज जोडणी देण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यात गुरुवार – शुक्रवारी मुसळधार पाउस आणि जागोजागी पाणी साचले असतांनाही महावितरण कर्मचा-यांनी तत्परतेने नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत. यात बुटीबोरी विभागाअंतर्गत 5 आणि नागपूर पश्चिम शाखेअंतर्गत एका नवीन वीज जोडणीचा देखील समावेश आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यांच्या सुचनेला अनुकुल प्रतिसाद देत महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विविध उपाययोजना केल्या असून त्याचाच एक भाग म्हणजे ग्राहकांना नवीन वीज जोडण्या त्वरीत देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी पायाभुत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी शहरी भागातील ग्राहकांना तीन तर ग्रामिण भागातील वीज ग्राहकांना सात दिवसांत वीज जोडणी देण्यासाठी विशेष मोहीम सुरु करुन ऋषी अशोक उधोजी आणि रवीशंकर पंचेश्वर यांच्यासारख्या ग्राहकांना तत्परतेने वीज जोडणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल दोडके आणि त्यांच्या सहका-यांचे महावितरणच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचा लाईनस्टाफ़ने पाहणी करुन लगेच आवश्यक ते शुल्क भरून घेतले, शुल्क भरताच काही तासात महावितरण कर्मचा-यांनी त्यांच्याकडे नवीन वीज मीटर बसवून वीज जोडणि सुरु करुन दिली. महावितरणच्या या तत्पर सेवेबद्दल ऋषी अशोक उधोजी आणि रवीशंकर पंचेश्वर यांनी महावितरणच्या अभियंता आणि कर्मचा-यांचे आभार मानले आहेत.
या मोहीमेअंतर्गत नवीन वीज जोडणीसाठी ग्राहकाचा अर्ज आल्यानंतर पाहणी अहवाल तयार करुन वीज जोडणीसाठी लागणा-या शुल्काची माहिती ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर द्यायची, ग्राहकाने या शुल्काचा ऑनलाईन भरणा करुन त्याची पावती व्हॉट्सऍपवर संबंधितांना पाठवायची. पावती मिळताच ग्राहकाकडे नवीन वीज मीटर बसवून नवीन वीज जोडणी द्यायची आहे. यासंबंधीच्या सुचना नागपूर परिमंडलातील महावितरणच्या सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.