– नैसर्गिक शेती मिशन कार्यशाळेचे आयोजन
नागपूर :- नैसर्गिक शेती सोबत गट शेतीचा प्रयोग जिल्ह्यात मिशन मोडवर राबविण्यात येत आहे . शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे येवून गट शेतीसाठी जनजागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले.
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृह येथे करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यशाळेला प्रकल्प संचालक डॉ.अर्चना कडू, जय किसान शेतकरी गटाचे संशोधक संचालक डॉ.संतोष चव्हाण, ग्रीनसर्ट बायोसोलुशनचे कार्यकारी अधिकारी डॉ.सुजित कैसारे, जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, कृषी विद्यालय नागपूरचे विस्तार कृषी विद्यावेत्त डॉ.विनोद खडसे, हॉटेल असोसिएशनचे तेजिंद्रसिंग रेणू तसेच कृषी विभागाचे कर्मचारी, शेतकरी गटाचे पदाधिकारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
डॉ. इटनकर पुढे बोलताना म्हणाले की, राज्य शासनाची महत्वाची योजना असून या अंतर्गत जिल्ह्यामध्ये 8 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. हे मिशन 170 गटाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून या गटाचा माध्यमातून शेतकरी उत्वादक कंपनी तयार होणार आहेत. यासाठी शासनाकडून निधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर कार्यशाळेचे आयोजन होणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
रासायनिक खतांचा वाढता प्रभाव लक्षात घेता सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे यासाठी शेतमालाची घाऊक तसेच निर्यातक्षम बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल. ‘विकेल ते पिकेल’ या योजनेतर्गंत नागपूर शहरामध्ये कार्यरत असलेले गट, बचत गट यांनी पुढाकार घेवून उत्पादीत मालाची थेट विक्री करावी. शेतकऱ्यांनी शेतीपूरक जोडधंदा निर्माण करावा तसेच मत्स्यपालन तलाव तयार करून मत्स्यशेती करण्यावर भर द्यावा. याप्रसंगी शेत बांधावरील प्रयोगशाळा या विषयावर डॉ.संतोष चव्हाण यांनी तर नैसर्गिक शेती प्रमाणीकरण पध्दती याविषयावर सुजित कैसरे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. विविध जैविक निविष्ठांचा वापर या विषयांवर डॉ.विनोद खडसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अर्चना कडू तर सूत्रसंचालन पल्लवी तलमले यांनी केले तर आभार सचिन ताकसांडे यांनी मानले.