यवतमाळ :- महिला व बालविकास विभागाच्यावतीने येथील दादासाहेब कोल्हे सभागृहात चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे बक्षिस वितरण व समारोप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर के.ए.नहार, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेव डायरे, सदस्य अनिल गायकवाड, ॲड.लीना आदे, वनिता शिरफुले, बाल न्याय मंडळाचे सदस्य राजू भगत, ॲड.काजल कावरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे उपस्थित होते.
तीन दिवसीय बालमहोत्सवात जिल्ह्यातील सर्व बालगृहातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बाल महोत्सवावेळी बालकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पहावयास मिळाला. दि.८ जानेवारी रोजी बाल महोत्सवाचे उद्घाटन झाले. उद्घाटनाला यवतमाळ अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष नितीन खर्चे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेव डायरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर महोत्सवाला सुरुवात झाली. महोत्सवादरम्यान धावणे, गोळा फेक, थाळी फेक, कबड्डी, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, गायन एकल व सामुहिक, एकल नृत्य, सामुहिक नृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. मैदानी खेळ नेहरू स्टेडियमच्या मैदानामध्ये घेण्यात आले.
शेवटच्या दिवशी दि.१० जानेवारी समारोप व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन १०९८, सखी वन स्टॉप सेंटर आणि जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. हा राज्यातील सर्वात मोठा बालमहोत्सवापैकी एक ठरला.
यावेळी बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान बाल कल्याण समिती मार्फत करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे परिविक्षा अधिकारी रविंद्र गजभिये, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे लेखापाल स्वप्नील शेटे, सामाजिक कार्यकर्ता आकाश बुर्रेवार यांनी विशेष प्रयत्न केले.