संशोधन आणि रोजगाराभिमुख शिक्षण प्रणालीला प्राधान्य -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे 

मुंबई :- राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत एनसीईआरटीचा अभ्यासक्रम स्वीकारताना राज्याशी संबंधित माहितीचा अंतर्भाव करून संशोधनाला प्राधान्य देणारी आणि रोजगाराभिमुख शिक्षण प्रणाली विकसित केली जाईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शालेय शिक्षण मंत्री तथा ‘पाठ्यपुस्तक मंडळा’चे अध्यक्ष दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) च्या कामाचा मुंबईतील प्रभादेवी येथे बालभारतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. प्रधान सचिव रणजितसिंह देओल यावेळी उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग, ‘एससीईआरटी’ चे संचालक डॉ. राहुल रेखावार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी बालभारतीच्या कार्यपद्धतीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यांना बालभारतीच्या माध्यमातून नियमित अभ्यासक्रमाबरोबरच रोजगाराभिमुख, कृषीविषयक माहिती देणाऱ्या, मातीशी नाते जोडून ठेवणाऱ्या, कला – क्रीडा विषयाची माहिती देणाऱ्या अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत, ही समाधानाची बाब आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी संशोधनाला प्राधान्य देणारी शिक्षण प्रणाली विकसित केली जाईल. याव्यतिरिक्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचीही अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

शालेय मंत्री भुसे यांनी बालभारतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. अभ्यासक्रमाची पुस्तके थेट तालुका पातळीपर्यंत पोहोचवता येतील का याबाबत अभ्यास करण्याची सूचना त्यांनी केली. आधुनिक काळाची कास धरून बालभारतीचे कामकाज संपूर्ण संगणक आधारित करावे. बालभारतीच्या उत्पन्नामधून शैक्षणिक उपयुक्त उपक्रमांसाठी निधी खर्च करावा. केंद्राचा अभ्यासक्रम स्वीकारताना त्यात राज्याशी संबंधित माहितीचा समावेश करावा तसेच तो अभ्यासक्रम विद्यार्थी आवडीने शिकतील असा असेल, याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. भुसे यांच्या हस्ते यावेळी जर्मन भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग, एससीईआरटी चे संचालक डॉ. राहुल रेखावार यांनी यावेळी शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'आरे'चा मास्टर प्लॅन तयार - दुग्धविकास मंत्री अतुल सावे

Tue Feb 18 , 2025
मुंबई :- गोरेगाव परिसरातील आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून येत्या काही दिवसांत ‘आरे’चा कायापालट झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. दुग्धविकास मंत्री सावे यांनी आरे दुग्ध वसाहत परिसराची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार मुरजी पटेल, आमदार बाळा नर, ‘आरे’चे सीईओ श्रीकांत शिपूरकर उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!