संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 5 :- असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टिचर्स ऑफ इंडिया निवडणूक -२०२२ मध्ये श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी कामठी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर राष्ट्रीय अध्यक्ष पदावर विजयी झाले, त्याकरिता श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी च्या वतीने संस्थेच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टिचर्स ऑफ इंडिया ही भारतातील सर्व औषधीनिर्माणशास्त्र शिक्षकांची संघटना असून संपूर्ण भारतात सुमारे ९ हजार फार्मसी शिक्षक हे या संघटनेचे सदस्य म्हणून नोंदणीकृत आहेत. यावर्षी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी भारतातून एकुण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. अत्यंत चुरशीच्या लढतीत महाराष्ट्रातील श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी कामठी, नागपूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून विजयी घोषित करण्यात आले.
डॉ उमेकर यांनी महाविद्यालय सह संस्थेचे नांव राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केले याबाबत सत्कार कार्यक्रमाला उपस्थित श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर तसेच संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन डॉ मिलिंद उमेकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे कार्यकारी संचालक अनुराग भोयर, संस्थेद्वारा संचालित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी यावेळी डॉ मिलिंद उमेकर यांचे अभिनंदन केले.