रेल्वेप्रवासी महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई :- महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे. अनुचित घटना होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

‘रेल्वेमधील प्रवासी महिलांची सुरक्षा’ या विषयाच्या अनुषंगाने आज विधान भवनातील सभा कक्षात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी या बैठकीत मागील बैठकांमध्ये दिलेल्या निर्देशावर कोणती अंमलबजावणी झाली याची माहिती घेतली. त्याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले. रेल्वेत क्यूआर कोड सिस्ट‍िम असावी. सुरक्षा रक्षकाची असलेली कमतरता पूर्ण करणेबाबत पाठपुरावा करावा, निर्भया निधी रेल्वे पोलिसांना उपलब्ध करावा. गर्दुले लोकांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, सामाजिक संस्थाच्या प्रश्नांबाबत काय अंमलबजावणी केली त्याचा अहवाल तयार करावा, दक्षता समिती महिला व महिला सुरक्षा कर्मचारी यांचे व्हॉटस् अप ग्रुप करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

विशिष्ट वेळेनुसार स्वयंसेवी प्रवासी महिलांचे व्हॉटस् अप ग्रुप करावेत, दक्षता समिती सदस्याच्या लोकेशनबाबत डॅशबोर्ड तयार करावेत, मनोधैर्य योजनेचे प्रस्ताव तयार करावे, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष रेल्वे स्थानकावर करावेत. महिलांच्या डब्यामध्ये ऑटोमॅटिक सेनेटरी नॅपकीन मशीन आणि चेंजिंग रूम असावी. रेल्वे स्टेशन व रेल्वेतील सीसी टीव्हीचे ऑनलाईन सनियंत्रण करावे, असेही निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

महिला प्रतिनिधींनी डार्क स्पॉट्स आणि सिग्नलला अपघात घडतात, त्याबाबत सूचना केल्या. त्याबाबत मदत करावी, तसेच एस्केलेटर चढत असताना साध्या पायऱ्या विनाआधार असतील, त्या दुरुस्त कराव्यात. याकडे संबंधीत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या संपूर्ण प्रश्नाबाबत केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही सविस्तर पत्र पाठविले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

रेल्वे पोलिसांशी संबंधित प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी तातडीने सहकार्य करावे, असे निर्देश गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंह यांना दिले. तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशाही सूचना पोलीस व रेल्वे प्रशासन यांना दिल्या.

तसेच रेल्वे प्रवाशांना फटका मारून दुखापत व लूट करणाऱ्या फटका गॅगवर नियंत्रण आणल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी रेल्वे पोलीसांचे अभिनंदनही केले.

या बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक रेल्वे सुरक्षा डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलीस आयुक्त (रेल्वे) डॉ शिसवे, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे शुक्ला, विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते. तसेच महिला दक्षता समितीच्या रेणुका साळुंखे, अरुणा हळदणकर, लीला पटोडे, आशा गायकवाड, प्रतिका वायदंडे यावेळी उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईत १३ जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी

Thu Jul 6 , 2023
मुंबई :- सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी, १३ जुलै २०२३ पर्यंत बृहन्मुंबई क्षेत्रात जमावबंदीचे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी दिले आहेत. सार्वजनिक शांतता बिघडवणे , मानवी जीवितास धोका , मालमत्तेची हानी , कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीची मिरवणूक आणि कोणत्याही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com