– मेहंदी कलावंत तसेच मनाचे श्लोक पठण व वंदे मातरम् गाणाऱ्या शाळांना प्रशस्तीपत्र
नागपूर :- ‘समाजातील सांस्कृतिक परंपरा टिकल्या पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास महिलांच्या हाताला काम मिळणे आणि त्यांना रोजगार मिळणे हा उद्देश आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार, दि. १२ एप्रिल) केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित शारदोत्सवात मेहंदी रेखाटणाऱ्या कलावंतांना ना. गडकरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत आयोजित अध्यात्मिक महोत्सवात मनाचे श्लोक पठण व वंदे मातरम् गायन या दोन्ही उपक्रमांची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने दखल घेतली आहे. श्लोक पठन व गायन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट सात शाळांना देखील यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, माजी आमदार प्रा. अनिल सोले, जयप्रकाश गुप्ता, माजी नगरसेविका प्रगती पाटील, गौरीशंकर पाराशर, राजेश बागडी, दीपक खिरवडकर, मनीषा काशीकर, मेहेंदी कलावंत सुनीता धोटे यांच्यासह खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती व भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
ना. गडकरी यांनी सांस्कृतिक उपक्रमांमधून रोजगाराचे दालन खुले होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘मेहंदी काढणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य मिळाले. भविष्यात मेहंदी काढण्याच्या कौशल्यातूनच रोजगाराचे नवे दालन खुले होऊ शकते. त्यासाठी येत्या काळात मेहेंदी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येतील. नागपुरात मेहेंदी रेखाटणाऱ्या दहा हजार महिला तयार व्हाव्यात यादृष्टीने काम करायचे आहे. रोजगार आणि आनंद यांचा मेळ साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
ना. गडकरी यांनी मनाचे श्लोक पठण व वंदे मातरम् गायन करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, ‘हजारो मुलांनी वंदे मातरम् गायन व मनाचे श्लोक पठण करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. अशा उपक्रमांमधून मुलांवर उत्तम संस्कार होत असतात. त्यांच्या जगण्यामध्ये गुणात्मक बदल झाला पाहिजे, हा उद्देश आहे.’
मनाचे श्लोक व वंदेमातरम् : या उपक्रमात १७५ शाळांच्या २८ हजार ३२९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर १२९५ शिक्षकांनी परीश्रम घेतले.
मेहंदी रेखाटणे : या उपक्रमातांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये एकूण ४०९ कार्यक्रम झाले. यामध्ये ६२५ मेहंदी कलावंतांनी ४५ हजारांपेक्षा जास्त हातांवर मेहंदी रेखाटली.