Ø मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम
नागपूर :- मराठी भाषेला वैभवशाली वारसा लाभला असून संस्कृतीची जोपासना आणि संवर्धनासाठी मराठी भाषेचे महत्त्व लक्षात घेता. भाषेच्या संवर्धनासाठी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हायला हवा, असे प्रतिपादन महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धन, एकचिंतन तसेच काव्य वाचनाचा कार्यक्रम नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना खवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तेजोसिंग पवार, महानगर पालिकेच्या उपायुक्त विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, मराठी भाषा अधिकारी शिल्पा सोनाले, कवी व व्याख्याते प्रताप वाघमारे, गझलकार अझीझ खान पठाण, हास्य कवी गोपाल मापारी, सुप्रसिद्ध अभिनेता व गझलकार किशोर बळी, सहायक भाषा संचालक संतोष गोसावी, तहसिलदार संदिप माकोडे आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये मराठी भाषा विषयावरील निबंध स्पर्धेत चेतन नागपूरे यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कुंदा निशाने यांना द्वितीय क्रमांकाचा आणि मृणालिनी वंजारी यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्न मंजूषा स्पर्धेत पंकज बोरकर व चेतन नागपूरे यांना प्रथक क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सचिन चव्हाण यांना द्वितीय क्रमांकाचा आणि रितेश भूयार यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुद्धलेखन स्पर्धेत लिखिता आजगावकर, ममता ढोबळे, संध्या निमसडे व रुपाली उगे यांना प्रथक क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर विजया थेरे, सचिन चव्हाण यांना द्वितीय क्रमांकाचा आणि सविता फाले व मृणालिनी वंजारी यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कविता वाचन स्पर्धेत रश्मी चिंतलवार यांना प्रथक क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर संचालक माहिती कार्यालयाच्या रुपाली उगे व रितेश भूयार यांना द्वितीय क्रमांकाचा आणि लिखिता आजगावकर यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठी भाषा संवर्धन व एकचिंतन या विषयावर प्रताप वाघमारे यांनी बोली भाषा ही भाषेचे मूळ असून बोली भाषेचे संवर्धन आवश्यक आहे. भारतातील विविध प्रांतात अस्तित्वात असलेल्या बोली भाषेमुळेच भाषेची समृद्धी आहे. भाषा ही उपक्रमशील, प्रवाही व विविधतेशी अंतरसंबंध असली पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेला जागतिकस्तरावर मान्यता मिळेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी भाषा अधिकारी श्रीमती शिल्पा सोनले यांनी केले. मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेचा प्रशासकीय तसेच दैनंदिन व्यवहारात वापर वाढावा यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे मातृभाषेचा गौरव म्हणून कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशावरी देशपांडे तर आभार प्रदर्शन तहसिलदार संदिप माकोडे यांनी मानले.
सांज शब्दांची बहारदार मेजवानी
मराठी भाषा दिनानिमित्त मराठी गझल, कविता आणि किस्स्यांची बहारदार मैफील तसेच मराठी भाषा संवर्धन-एकचिंतन हा सांज शब्दांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मराठी रसिकांचा उत्सस्फुर्त प्रतिसाद लाभला. सुप्रसिद्ध गझलकार व अभिनेता किशोर बळी यांनी मराठी गझल व कविता सादर केल्या. तसेच गोपाल मापारी यांनी हास्य कविता, अझिझ खान पठाण यांच्या बहारदार गझलांसोबतच महसूल अधिकारी, कवि व व्याख्याते प्रताप वाघमारे यांनी विविध कविता सादर करतांना बोली भाषेचा प्रभाव तसेच व्यवहार, व्यवसाय व राज्य कारभारामध्ये मराठीचा वापर यासंदर्भात व्याख्यान सादर केले.