Ø मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
Ø विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज
Ø संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवा
Ø आंतरराज्य सिंचन प्रकल्पासंदर्भात समन्वय
Ø जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित
नागपूर :- हवामान खात्याने विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही तसेच बाधित होणाऱ्या गावांसाठी विशेष कृती आराखडा तयार करुन प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले.
जिल्हा व तालुकास्तरावर महसूल, जलसंपदा, आरोग्य तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने नियंत्रण कक्ष तयार करुन तात्काळ मदतीसाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा सज्ज् ठेवावी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून मतदकार्यासाठी नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी श्रीमती बिदरी यांनी दिले.
नागपूर विभागातील मान्सूनपूर्व नियोजनाचा आढावा आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, रेल्वे, वायुसेना, आर्मी, भारतीय हवामान खाते, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विभागात समाधानकारक पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला असून 15 जुन नंतर पावसाला सुरुवात होणार आहे. पावसासंबंधी पूर्व सूचना सर्व समाजमाध्यमाद्वारे जनतेला उपलब्ध करुन देण्याची सूचना करतांना बिदरी म्हणाल्या की, मागील वर्षाच्या पावसाळ्यात ज्या गावांना पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली होती अशा गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने आर्मी, एयरफोर्स तसेच एसडीआरएफ व एनडीआरएफ या यंत्रणांनी सज्जता ठेवावी. जिल्हाधिकारी यांनी मागणी करताच जलद गतीने बचाव कार्य सुरु करता येईल. गडचिरोली जिल्ह्यातील 120 पेक्षा जास्त गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो तसेच भंडारा, चंद्रपूर आदी जिल्ह्यातही अशा प्रकारची परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून महसूल विभागाने सज्जता ठेवावी अशी सूचना केली.
वैनगंगा नदीवरील संजय सागर तसेच तेलंगाना राज्यातील मेडीगट्टा या प्रकल्पातून पाणी सोडतांना समन्वय ठेवण्याच्या दृष्टिने आंतरराज्य बैठक आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पावर नियंत्रणासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी . सिंचन प्रकल्पातून पाणी सोडतांना नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वसूचना द्यावी. त्यानुसार यंत्रणा सज्ज ठेवणे सोयीचे होईल. सिंचन विभागातर्फे नियंत्रण कक्षाद्वारे विभागातील सर्व प्रकल्पांच्या जलसाठ्याबद्दलची माहिती जिल्हा प्रशासनाला नियमित सादर करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा
पावसामुळे ज्या भागात पाणी साचत असेल तसेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बाधित होत असतील अशा भागांसाठी आरोग्य विभातर्फे विशेष दक्षता घेवून साथीचे आजार होणार नाही यादृष्टिने नियोजन करावे तसेच नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे निर्देश देतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या की, पावसाळ्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी नियमीत भेट देवून तपासणी करावी असे निर्देश देण्यात आले.
आरोग्य विभागाने रॅपिड रिस्पॉन्स टिम तयार करुन ज्या भागात साथीच्या रोगाचे प्रमाण आढळून येईल अशा भागांना भेट देवून आरोग्य तपासणी करावी. यासाठी आरोग्य विभागाने नियंत्रण कक्ष सज्ज ठेवावे असे यावेळी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांची मान्सुनच्या दृष्टिने विशेष दुरुस्ती करावी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी विशेष कृती आराखडता तयार करावा. महानगरपालिकांनी नालेसफाईला प्राधान्य देवून मान्सून येण्यापूर्वी पावसाचे पाणी कुठेही थांबणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले. यावेळी विविध यंत्रणांनी मान्सुनपूर्व तयारीसंदर्भात केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. प्रारंभी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात नागपूर विभागातील मान्सुनपूर्व तयारी संदर्भात माहिती दिली.