यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ विधानसभा क्षेत्रात आयटीआय येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात एकून 150 उमेदवारांची विविध नामांकित कंपन्यामध्ये प्राथमिक निवड करण्यात आली.
मेळावा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी जी. यु. राजुरकर होते तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे, प्रबंधक ए. पी. भुते उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एनआरबी बेअरिंग्ज ही नामांकित कंपनी सहभागी झाली होती. कंपनीने त्यांच्याकडील 116 रिक्त पदे अधिसूचित केली होती. या पदांसाठी मुलाखती घेण्याकरीता कंपनीचे एचआर राजु शहा हे उपस्थित होते. यावेळी राजुरकर यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. उमेदवारांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्याकरीता शुभेच्छा दिल्या.
सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी मेळाव्याच्या संधीचा लाभ घेऊन मुलाखती देण्याकरिता विद्यार्थ्यांना आवाहन केले. या मेळाव्याचा एकूण 219 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून एकूण 150 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड झाली. रोजगार मेळाव्याचा स्वयंरोजगाराच्यादृष्टीने तसेच कर्ज योजनेच्यादृष्टीने विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांनी सहभाग घेऊन उपस्थित विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्यादृष्टीने असलेल्या कर्ज योजनेविषयी माहिती दिली.