– शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना काल बारामतीतील टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या काल बारामतील टेक्स्टटाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांची नात रेवती सुळेदेखील त्यांच्या सोबत होती. त्या आत जात असतानाच टेक्स्टटाईल पार्कच्या गेटवर त्यांना अडवण्यात आलं. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. शरद पवारांची लेक आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राम कृष्ण हरी.. दुसरे काय बोलणार यावर, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या भोरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
मी स्वतः त्या गेटने जाते. त्यामुळे काल आईसोबत माझा पीए होता. त्यांना आधी कळवलं होतं. मला ह्यामध्ये पडायचं नाही. पण आता जे टेक्सटाईल्सचं काम बघतात. ते आता सत्तेवर आहेत. मोठ्या पदावर आहेत. त्यांना लोकांशी कसेही वागायचं अधिकार आहे. ही घटना झाली हे दुर्दैव आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी कालच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला. यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याचा मी जाहीर निषेध करते. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे असल्या भाषेला थारा कुणी देणार नाही. लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचं अधिकार आहे. ते देवा भाऊ आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुण्यावरून सोलापूरला जात असताना निवडणूक आयोगाकडून खासदार सुप्रिया यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. कापूरहोळ सासवड रस्त्यावर गाडीची तपासणी करण्यात आली आहे. तर मांजरी-हडपसर इथं हेलिकॉप्टरमधील बॅग्सची तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या हातात बंदूक पाहिजे पण आमचा देवा भाऊ बंदूक घेऊन फिरतो. पण पोलिसांना सांगतो आमचे सरकार आले की सर्वात मोठी पोलीस भरती करणार आहेत. सोलापुरात पैसे वाटपाचा व्हिडिओ आला आहे. तो व्हीडिओ मला द्या मी तो ट्वीट करते. इलेक्शन कमिशनला पण तो व्हीडिओ पाठवते, असं सुप्रिया सुळे सोलापूरच्या सभेत म्हणाल्या.