– वाहीनी विलगीकरणाची कामे त्वरीत मार्गी लावण्याचे निर्देश
नागपूर :- महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालय अंतरगत येत असलेल्या विदर्भात सर्वत्र सुरु असलेल्या वाहिनी विलगीकरणच्या कामांना गती देण्याचे निर्देश संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी आज (दि. 29 जुलै) दिले. महावितरणच्या काटोल रोडवरील ‘विद्युत भवन’ कार्यालयात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्यासह प्रादेशिक कार्यालय आणि नागपूर, चंद्रपूर, गोंदीया व अमरावती या परिमंडलातील अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) आणि कंत्राटदार एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत रेशमे यांनी सर्वेक्षणानुसार आवश्यक असलेल्या परवानग्यांसोबतच वन विभाग, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, रेल्वे आणि समृद्धी महामार्ग यांचाकडुन मिळालेल्या व प्रलंबित असलेल्या परवानग्यांची विस्तृत माहिती घेत प्रलंबित परवानग्या लवकरात लवकर मिळवून वाहीनी विलगीकरणाची कामे त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश सर्व संबंधीत अधीक्षक अभियंते आणि कंत्राटदार एजन्सीच्या प्रतिनिधींना दिले. वाहिनी विलगीकरण योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यात तब्बल 421.06 कोटी रुपयांची 205 वाहिन्यांच्या विलगीकरण करण्याचे काम प्रस्तावित असून वर्धा जिल्हयात 220.6 कोटी रुपयांची 87 वाहिन्यांच्या विलगीकरणाची कामे प्रस्तावित आहेत. याशिवाय गडचिरोली मंडलातील 467.04 कोटीची 105 वाहिन्यांच्या विलगीकरणाची, चंद्रपूर मंडलातील 309.35 कोटीची 105 वाहिन्यांच्या विलगीकरणाची, अमरावती मंडलातील मंडलातील 530.88 कोटीची 205 वाहिन्यांच्या विलगीकरणाची तर गोंदिया मंडलातील 357.27 कोटीची 131 वाहिन्यांच्या विलगीकरणाची कामे प्रस्त्वाइत असून यापैकी अनेक कामांना सुरुवात देखिल करण्यात आली आहे.
वाहिनी विलगीकरणाची कामे पुर्ण होताच 15 दिवसांत या वाहिन्या सुरु करण्याचे निर्देश देखिल संचालक (प्रकल्प) यांनी यावेळी दिल्या. याबैठकीला अधीक्षक अभियंते सर्वश्री राजेश नाईक, मंगेश वैद्य, संजय वाकडे, भिमराव हिवरकर, दिपाली माडेलवार, रमेश सानप यांचेसह अशोका बिल्डकॉन लिमिटेड, पॉलीकॅब इंडीया लिमिटेड आणि किशोर इन्फ़्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेड कंत्राटदार एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.