– आदिवासी बहुल गावाच्या विकासात पडणार भर
– पुसद प्रकल्पातील १४७ गावांमध्ये राबणार अभियान
यवतमाळ :- देशातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान ही योजना राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे संपूर्ण देशभरातील ३० राज्य व केंद्रशासित प्रदेशातील ५४९ जिल्ह्यांमधील २ हजार ७४० तालुक्यातील ६३ हजार ८४३ आदिवासीबहुल गावांचा विकास साधला जाणार आहे. पुसद आदिवासी प्रकल्पातील १४७ गावांचा यामध्ये समावेश आहे.
अभियानातंर्गत या गावामध्ये ७९ हजार २५६ कोटी रुपयाची विकास कामे करण्यात येणार आहे. त्यामध्ये ५६ हजार ३३३ कोटी केंद्राचा वाटा असून २२ हजार ८२३ कोटी राज्याचा वाटा असणार आहे. या अभियानातंर्गत १७ मंत्रालयीन विभागांना २५ प्रकारच्या योजना राबवायच्या आहे. अनुसूचित जमातीसाठी विकास कृति आराखडा अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून विभागांना ५ वर्षाच्या कालावधीत ठरवून दिलेली साध्ये प्राप्त करावयाची आहेत. या माध्यमातून राज्यातील ३२ जिल्हातील १२ लाख ८७ हजार ७०२ आदिवासी बांधवांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे.
अभियानात ग्रामीण विकास मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, उर्जा, आरोग्य व कुटुंब कल्याण, पेट्रोलियम व नैसर्गिक वायु, महिला व बाल विकास, शिक्षण, आयुष, दूरसंचार, कौशल्य विकास व उद्योजकता, इलेक्ट्रॅानिक्स व माहिती तंत्रज्ञान, कृषि व शेतकरी कल्याण, मत्स्य, पशुसवर्धन व डोंगरी विभाग, पंचायतराज, पर्यटन या मंत्रालय व विभागाचा समावेश असणार आहे.
या विभागामार्फत आदिवासी बहुल गावामध्ये पक्की घरे, रस्ते, पाणी पुरवठा, घराचे विद्युतिकरण, नविन सौरउर्जा योजना, फिरते आरोग्य पथक, आयुष्यमान भारत कार्ड, एलपीजी कनेक्शन, अंगणवाडी केंद्र व वस्तीगृहांची स्थापना, पोषण वाटीका, भारतनेट, स्कील इंडिया मिशन, शाश्वत शेती प्रसिद्धी, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, राष्ट्रीय पशुधन मोहिम, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, ट्रायबल होम स्टे, प्रधानमंत्री आदी दर्शन ग्राम योजना या योजनाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या सोबतच ट्रायबल मल्टीपर्पज मार्केटिंग सेंटर्स, वनहक्क धारकासाठी शाश्वत उपजीविका, सिकलसेल आजारसाठी क्षमता केंद्रे, आश्रमशाळा, वसतिगृहातील पायाभूत सुविधा यावर भर दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सदर अभियान पुसद आदिवासी प्रकल्पातील पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, आर्णी, नेर या ७ तालुक्यातील १४७ आदिवासी बहुल गावात राबविले जाणार असल्याचे सांगितले. पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी अभियान कार्यालयीन यंत्रणांच्या सहभागातून राबवून १४७ गावांचा सर्वागीण विकास करण्याचा मानस व्यक्त केला.