Ø आतापर्यंत 5 हजार कोटीवर कर्जपाटप
Ø योजनेने अनेकांना दिला स्वयंरोजगार
यवतमाळ :- होतकरू युवकांना आपला स्वत: स्वयंरोजगार सुरु करता यावा, यासाठी केंद्र शासनाने सन 2015-16 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा बॅंक योजना सुरु केली. या योजनेने जिल्ह्यात अनेकांना आत्मनिर्भर बनविले आहे. योजनेंतर्गत आतापर्यंत 13 लाख 66 हजार खातेधारकांना तब्बल 5 हजारावर कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.
प्रत्येकाला शासकीय नोकरीची अपेक्षा असते, परंतू सगळ्यांचेच नोकरीचे स्वप्न पुर्ण होत नाही. रोजगार, स्वयंरोजगारातून आर्थिकदृष्ट्या सक्षमच नाही तर समृद्ध देखील होता येते. त्यासाठी होतकरू युवकांना संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा बॅंक योजना सुरु केली. अल्पावधीतच ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली. योजनेंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गॅरंटरची आवश्यक्ता नसल्याने कर्ज मिळविणे सहज आणि सोपे असल्याने जिल्ह्यात या योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभला.
ही योजना लाभार्थ्यांच्या आवश्यक्तेप्रमाणे एकून चार प्रकारात राबविली जाते. पहिल्या शिशू गटात लाभार्थ्यांस 50 हजारापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. किशोर गटात 50 हजार ते 5 लाखापर्यंत कर्ज मर्यादा आहे. तरूण गटात 5 लाख ते 10 लाखापर्यंत तर तरुण प्लस गटात 10 ते 20 लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 13 लाख 66 हजारावर खातेधारकांना 5 हजार 381 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.
योजनेच्या पहिल्या वर्षी 2015-16 यावर्षी 4 हजार 298 खातेधारकांना 37 कोटी 9 लाखाचे कर्ज वितरण करण्यात आले. त्यानंतर सन 2016-17 यावर्षी 83 हजार 375 खातेधारकांना 180 कोटी 71 लाख, सन 2017-18 साली 1 लाख 17 हजार 934 खातेधारकांना 347 कोटी 18 लाख, सन 2018-19 यावर्षी 1 लाख 34 हजार 199 खातेधारकांना 419 कोटी 39 लाख, सन 2019-20 यावर्षी 1 लाख 80 हजार 871 खातेधारकांना 609 कोटी 33 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.
सन 2020-21 यावर्षी 1 लाख 50 हजार 444 खातेधारकांना 610 कोटी 16 लाख, सन 2021-22 यावर्षी 1 लाख 84 हजार 304 खातेधारकांना 718 कोटी 77 लाख, सन 2022-23 यावर्षी 2 लाख 21 हजार 197 खातेधारकांना 866 कोटी 56 लाख, सन 2023-24 यावर्षी 1 लाख 74 हजार 340 खातेधारकांना 897 कोटी 55 लाख तर यावर्षी आतापर्यंत 1 लाख 15 हजार 276 खातेधारकांना 694 कोटी 73 लाखाचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.