– प्रेक्षकांनी गायनातून अनुभवले भक्तीमय वातावरण
– आज सिंधुरागिरी महानाट्य सादर होणार
नागपूर/रामटेक :- प्रसिद्ध भक्तीगीत गायक हंसराज रघुवंशी यांनी सादर केलेल्या भगवान श्रीराम, भगवान शंकर आदींवरील एकापेक्षा एक सरसभक्ती रचनांनी महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रसिक प्रेक्षक भक्ती रसात न्हाहून निघाले.
येथील नेहरू मैदानावर सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.खासदार कृपाल तुमाने,आमदार ॲड.आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, रामटेकच्या उप विभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आदी उपस्थित होते.
‘शंभू शंकर नमः शिवाय …’ या सुमधूर गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि बघता बघता प्रेक्षकही या गीतावर तल्लीन झाले. सर्वांच्या ओठावर असणारे आणि विशेषतः ग्रामीण भागात अनेक धार्मिक कार्यात प्रामुख्याने गायले जाणारे ‘ओम् नमः शिवाय,ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय गीत सुरू होताच हंसराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रेक्षकांनी मोबाईलचे टॉर्च हातात उंचावले व त्यांच्या मागे सर्वांनी गीत गायले.
गहन आध्यात्मिक अर्थाने ओतप्रोत असणारे “शिव समा रहे मुझमे ओर मैं शून्य हो रहा हुं…” या गीताच्या सादरीकरणाने नेहरू मैदानावरील वातावरण काही काळासाठी स्तब्ध झाले होते. शिवशंकर आणि प्रभू श्रीराम यांच्या व्यक्तीमत्वाचा एक- एक धागा उलगडणारी भक्तीभाव आणि आध्यात्मविचार मांडणारी रचना महासंस्कृती महोत्सवाचा तिसरा दिवस स्मरणीय करणारी ठरली.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्यातील पहिला महासंस्कृती महोत्सव रामटेक येथे सुरू असून या महोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे.
पहिल्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना हेमा मालिनी यांचे सादरीकरण झाले. दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम झाला.
सोमवार २२ जानेवारी रोजी या महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी ७.०० वाजता रामटेक व प्रभू रामचंद्रांच्या दोन भेटींचे महात्म्य सांगणारे सिंधुरागिरी हे महानाट्य सादर होणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.