मुंबई : राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबत कृषि विभाग कार्यवाही करत आहे. सध्या आवश्यकता तपासून तासिका आणि मानधन तत्वावर पदे भरण्याच्या सूचना कृषि विद्यापीठांना केल्या असून पदोन्नतीचा विषयही लवकर मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
विधानपरिषदेत सदस्य सतिश चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे कृषि विद्यापीठातील रिक्त पदांचा प्रश्न मांडला होता.
कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि डॉ.बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठ, दापोली या चारही विद्यापीठात शिक्षक आणि शिक्षकेतरांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सध्या त्या पदांचा अतिरिक्त कार्यभार देऊन कामकाज करण्यात येत आहे. याशिवाय, पदोन्नतीची प्रक्रियाही गतीने राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. रिक्त जागांची पदभरती करण्यासंदर्भातील प्रस्ताव नियमाप्रमाणे तयार करुन त्याची कार्यवाही केली जाईल, या दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाहीच्या सूचना कृषि विद्यापीठांना देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
या लक्षवेधीवरील चर्चेत श्री. चव्हाण यांच्यासह सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.