राजनीती राष्ट्रासाठी…..

2 जुलैला राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या भ्रष्टाचाराचे मुकुटमणी असलेल्या लोकांसोबत अनेक चोट्याल राष्ट्रवादी आमदार भाजप शिवसेना(शिंदे) यांच्या सरकार मध्ये सामील झाले.

महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील राजकीय क्षेत्रात भूकंप झाल्यासारखे जाणवले.

मोदी आणि भाजपच्या विरोधात विपक्षांची मोट बांधणाऱ्या सर्वच बोलभांड नेत्यांच्या पायाखालची जमीनच एकदम सरकली.आमच्या नागपुरी भाषेत सांगायचे झाल्यास सर्वांची टरर फाटली. 13 जुलैला बंगलोरला होणारी विरोधी ऐक्याची बैठकच पुढे ढकलण्यात आली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार जे या विरोधी ऐक्याचे तथाकथित नेते आहेत तिथेही तवा गरम झाला आहे असे विधान सुशीलकुमार मोदी यांनी करून दिल्याने बिहारमधील राजकीय वातावरण सुदधा ढवळून निघाले आहे.

खुद्द बंगलोर येथे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री शिवकुमार व 65 आमदार सुद्धा बॅग भरून तयार बसले आहेत अशी अंदर की खबर आहे.

राजस्थानमधील स्थिती तर दोलायमानच आहे. छत्तीसगड येथे सिंहदेव हे उपमुख्यमंत्री म्हणून मुळीच खुश नाहीत. तिथेही भाजपने शेकोटी पेटवणे चालूच ठेवले आहे.

ही सर्व राजकीय उलथापालथीची स्थिती असताना, मला माझ्या अनेक मित्रांचे फोन आलेत.

राजकीय शुचिता आणि भ्रष्टाचार निर्मुलनाचे कंकण बांधून सत्तेवर आलेल्या भाजपासारख्या पक्षाने सुदधा शेवटी सत्तेसाठी सर्व तत्वे गुंडाळून ठेऊन कालपर्यंत ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून नावे ठेवली त्यांना सत्तेत घेतले.

सर्वसामान्यत:ही तक्रार अयोग्य मुळीच नाही. मुळात राजकारण हे सामान्य लोकांसाठी कधीच नसते. अगदी प्राचीन काळापासून हे सत्य आहे.राजनीती मध्ये भावनेला मुळीच स्थान नाही. हे सुदधा अगदी पौराणिक काळापासून स्थापित सत्य आहे.

राजकारणाचा अभ्यास करताना आपण महाभारताचा इतिहास डोळ्यासमोर आणला पाहिजे. सत्ता, पुत्रमोह व कुटीलता आणि राजनीती या सर्व घटना या महाभारतात विद्यमान आहेत.

अगदी शंतनू पासून बघा की सत्यवती ने सुद्धा शांतनूशी विवाह करताना हस्तिनागपूरची सत्ता माझ्या होणाऱ्या मुलाला मिळणार असेल तरच मी तुझ्याशी लग्न करेन अशी अट घातली होती. शंतनू ने ती अट मान्य करण्यास नकार दिला तेव्हा त्याचा पुत्र खुद्द देवव्रत,भीष्माने आपले युवराजपद सोडून आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा घेतली होती.

भीष्माच्या या प्रतिज्ञेमुळेच कुरुकुलात भविष्यात जो भीषण सत्ता संघर्ष उदभवला तो राजनीतीच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे.अभ्यासला पण पाहिजे.

धृतराष्ट्र हा अंध होता पण जबरदस्त राजकारणी होता. कणक हा त्याचा अतिशय धूर्त असा सल्लागार होता.त्यानेच धृतराष्ट्राला कायम हतबल व लाचार अशी भूमिका वठवून आपल्या मनासारखे करवून घेण्याची नीती शिकवली होती.धृतराष्ट्राचे पुत्रप्रेम हे त्याचं नीतीचा परिणाम होते.

धृतराष्ट्राच्या या नीतीला विदुर,भीष्म व श्रीकृष्ण हे तिघेही चांगलेच ओळखून होते, असो.

या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील राजकीय स्थितीला सुद्धा पुत्रमोह व सत्तामोह हीच कारणे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी राजला डावलून लायकी नसताना उध्दवला उत्तराधिकारी घोषित करणे तसेच शरद पवार यांनी देखील हेच केले.यामुळे महाराष्ट्रात सत्तासंघर्ष उद्भवला आहे.

मी नेहमीच म्हणतो भारतीयांनी नेहमीच भगवान श्रीकृष्ण यांच्या चरित्राचा अभ्यास करावा. भगवंताचे हे चरित्र म्हणजे कुटनीति, राजनीती आणि सांसारिक जीवन याचे अतिशय उत्कृष्ट व अनुकरणीय उदाहरण आहे. अर्वाचीन भारतीय इतिहासात, आर्य चाणक्य, व छत्रपती शिवाजी महाराज हे भगवान कृष्णाचे निस्सीम भक्त होते म्हणूनच ते यशस्वी झाले.

काय नीती होती श्रीकृष्णाची ? उत्तर भगवंतानेच दिले आहे. आपल्या पोरांना दूध दही न खाऊ घालता जुलमी कंसाला ते विकणाऱ्या गोपींच्या घरी चोऱ्या करणे सुरू केले.यांत उद्देश चोरी करणे हा नव्हता हे वेगळे सांगायला नको.

अगदी तसेच धृतराष्ट्र आणि त्याच्या मुलांसोबत वागताना भगवंताने पांडवांना बहुतेक वेळा अधर्म करायला लावला.कारण काय तर ठकाशी महाठक झाल्याशिवाय यश मिळत नाही. कर्णाचे चाक जमिनीत रुतत असताना कृष्ण अर्जुनाला म्हणतो अरे बघतो काय मार त्याला, त्यावर अर्जुन म्हणाला हा अधर्म आहे तेंव्हा कृष्ण म्हणतो द्रोपदी वस्त्रहरण होत असताना याला धर्म नाही आठवला. अगदी तसेच धर्मराजाला सुदधा खोटे बोलायला लावले. तो जेव्हा कृष्णाला धर्म शिकवायला लागला तेव्हा कृष्ण म्हणाला युधिष्ठीर तू जर खोटं नाही बोलला तर हा द्रोणाचार्य तुम्हा सगळ्यां भावांना कच्चा खाऊन टाकेल चालेल का तुला ? तेव्हा कुठे तो धर्मराज सुद्धा खोटे बोलला.

अहो जेव्हा भीष्माचार्य अर्जुनाला भारी पडू लागलेत तेव्हा आपली शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा मोडून स्वतः भगवंत सुदर्शन चक्र घेऊन भीष्माचार्यावर धावले हा इतिहास सर्वांना माहिती आहेना ?

अहिंसेच्या स्थापनेकरता भगवंताने हिंसा घडवून आणली.महाभारत घडवून आणले.

भगवंताला विश्वकल्याण करायचे होते म्हणून त्यातल्या त्यात भले व सरळमार्गी असलेल्या पांडवांना त्याने हाताशी धरले. हे पांडव सरळमार्गी होते म्हणून द्युतात हरले व रानोमाळ भटकले. जसे अटलजी व अडवाणी तत्ववादी असल्यामुळे केवळ एक मताने सत्ता गमावून बसले हा नजीकचा इतिहास आपल्याला माहिती आहेच.

भाजपचे वर्तमान नेतृत्व हे बहुतेक श्रीकृष्ण भक्त असावेत, हे ठोक मध्ये आमदार व खासदार विकत घेतात. भाजपा सत्तेवर येऊन भारताला वैभवशाली, बलशाली करण्याचे ध्येय बाळगते म्हणून त्यांनी केलेली ही सत्तांतराची कृती अयोग्य असली तरी समर्थनिय आहे. कारण उद्देश पवित्र आहे. अन्य पक्षीयांचे भारतावर स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष राज्य होते. भारताची काय स्थिती करून ठेवली ती आपल्यासमोर आहे. त्या तुलनेत गत 10 वर्षातील भाजपा शासित भारताची तुलना करा फरक स्पष्ट होईल.

भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की कृती नव्हे तर उद्देश महत्वाचा आहे.सीमेवर शत्रूला गोळ्या घालणाऱ्या सैनिकाला फाशी नाही देत, विरचक्र देऊन त्याचा सन्मान केला जातो. तेच सर्वसामान्य जीवनात जर गोळी घालून जर कोणाला मारले तर त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवून फाशी दिली जाते.

वास्तविक पाहता कृती तर एकच आहे गोळ्या मारून हत्या करण्याची, पण उद्देश वेगळा आहे, एकझन शत्रूला गोळी मारतो आहे,आणि दुसरा हा सामान्य व्यक्तीला गोळी मारतो आहे.

इंग्लिश भाषेत सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की, Not the action, but the intention is important. भारतीय न्यायव्यवस्था देखील याच आधारावर दोषींना शिक्षा देत असते हे इथे नमूद करण्यासारखे आहे.

थोडक्यात काय तर वर्तमान भारतीय राजकारणात जे काही भाजपा नेतृत्व करीत आहे ते योग्यच आहे कारण लढाई ही अतिशय पाताळयंत्री लोकांशी आहे. भाजपा ची राजनीती ही राष्ट्रनिती आहे. स्वतःच्या परिवारासाठी नाही.

– भूमिका गौतम मेश्राम

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 74 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Thu Jul 13 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (12) रोजी शोध पथकाने 74 प्रकरणांची नोंद करून 34600 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!