संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ग्रामविकासाच्या नावावर जनतेची लूट चालवली जात असून जनतेनी निवडून दिलेले राजकारणी अप्रत्यक्ष रित्या ठेकेदार म्हणून काम करीत असतील तर निवडणुकीमध्ये झालेल्या खर्चित रकमेची एकप्रकारे जनतेकडून अप्रत्यक्षपणे वसुली म्हणता येईल .एकंदरीत विकास कामाच्या नावाखाली शासनाचा पर्यायाने जनतेचा लाखो रुपयांचा निधी राजकारण्यांच्या घशात जात आहे असे चित्र कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे तसेच ग्रामपंचायत स्तरावर होत असलेल्या विविध विकासकामासाठी वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने राजकीय कार्यकर्तेच ठेकेदार म्हणून काम करीत टक्केवारीत वाढ करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव दिला जात आहे.
शासन निर्देशांनव्ये जिल्हा परिषदेचे बहुतांश अधिकार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत ला दिले असल्याने गावातील सत्ताधाऱ्यांचे निकटवर्ती हे ठेकेदार झाले आहेत.हे ठेकेदार बांधकामे, दुरुस्ती आणि इतर कामात निकृष्ट दर्जाचा कामाना पुढाकार देत अधिक नफा लाटण्यासाठी हे राजकारणी सरसावले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीची विल्हेवाट लावली जात आहे.
शासनाने थेट सरपंचाला विशेष अधिकार दिले आहेत त्यामुळे काही ठिकाणी मनमर्जीने कामे केली जात असून बढेजावपणाचा आव आणला जात आहे .पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायात स्तरावर काही गावामध्ये शासनाच्या योजनेतुन अथवा स्थानिक फंडातून होणाऱ्या विविध कामामध्ये इमारतीची रंगरंगोटी, नाली बांधकाम, सिमेंट रस्ता बांधकाम, सौंदर्यीकरण,इमारत बांधकाम , नाल्या सरळीकरण असे अनेक कामे करण्यासाठी बहुधा राजकीय आशीर्वाद असलेले राजकारणी मंडळी जे त्या गावचे पदाधिकाऱ्यांचे हितचिंतक आहेत ते ठेकेदार बनले आहेत. तर या प्रकारामुळे ग्रामविकासाच्या नावाखाली भ्रष्ट व्यवहाराला उधाण आल्याने दर्जेदार कामापेक्षा निकृष्ट कामाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते तसेच महत्वाच्या कामाला तिलांजली तर मनमर्जीच्या कामाना प्राधान्य ही पद्धत रूढ झाली असून राजकारन्याची टक्केवारी वाढली आहे तर बहुधा ग्रामपंचायत मध्ये विकासकामांच्या नावावर लाखो रुपये किमतीचे कार्यरंभ आदेश देऊन कंत्राटदाराला कामे देण्यात आली आहेत मात्र या कंत्राटदारांना संबंधित सत्ताधाऱ्यांचा अभयपणा असल्याने कंत्राटी कामाचा शुभारंभ आजूनपावेतो केला नाही हे इथं विशेष!