पुणे :- राज्य सरकारच्यावतीने पोलिस दलाकरीता नवीन कार्यालये, वाहने, सीसीटिव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम राज्यातील पोलीस दल करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित ‘तरंग-२०२५’ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील शेळके, हेमंत रासने, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर असून ते राज्याचे उत्पादन व तंत्रज्ञानाचे हब आहे; शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध नागरिक याठिकाणी येत असतात. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यासोबत वाहतूकीच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. पुणे पोलीसांनी गंभीर घटनेच्यावेळी चांगल्या प्रकारे जलद प्रतिसाद देत त्या घटनांचा उलगडा केलेला आहे. यापुढेही पुण्यासारख्या शहरांमध्ये अधिकाधिक घटनेच्या अनुषंगाने पोलिसांचा प्रतिसादाचा वेळ कमीत कमी असला पाहिजे.
पोलीसांच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्यादृष्टीने देशातील सगळ्यात चांगला सायबर फ्लॅटफॉर्म राज्याने निर्माण केला आहे. केंद्र शासनाने १९४५ हा क्रमांक राज्याकरीता दिला असून तक्रारदाराला २४ तासाच्या आत कारवाई करुन अहवाल देण्यात येत आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्यदायी वातावरणात जगता यावे, याकरीता पोलीस कल्याणाच्या माध्यमातून आरोग्य, निवासस्थाने अशा अनेक गोष्टी राज्यशासनाने अजेंडावर घेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.
पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहिले पाहिजे, जातीय सलोखा राहिला पाहिजे, शहरातील वाहतूक कोंडी सुटली पाहिजे, नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ‘कॉप-२४’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्याकरीता पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही राज्य सरकार कमी पडणार नाही, असे सांगितले.
कुमार म्हणाले, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मागील एक वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासोबत गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कॉप-२४ उपक्रमाअंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला.