Ø निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
Ø जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बैठकीस उपस्थिती
यवतमाळ :- कोणतीही निवडणूक नि:पक्ष, निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस विभागाची अतिशय महत्वाची भूमिका असते. जिल्ह्यात लोकसभा निवडणूक उत्तमपणे पार पाडण्यासाठी या विभागाने नेहमीप्रमाणे दक्ष राहून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले.
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार तसेच पोलिस विभागाचे सर्व पोलिस निरिक्षक उपस्थित होते.
निवडणूक काळात कुठेही कायदा, सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडता कामा नये. जिल्ह्यात काही संवेदनशिल मतदान केंद्र आहेत, अशा केंद्रावरील परिस्थिती पोलिस व उपविभागीय अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे हाताळावी. सीआरपीसी नुसार फौजदारी प्रकरणे अंतीम बॅान्ड घेऊन निकाली काढावीत. तडीपारची काही प्रकरणे प्रलंबित असल्यास तसेच दारुबंदीची प्रकरणे देखील तातडीने निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
मागील निवडणुकीच्या काळातील घटना, हत्यारे जमा करण्याबाबतची कारवाई, सराईत गुन्हेगार, असामाजिक घटनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. निवडणूक काळात पोलिसांना विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्याअनुषंगाने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. निवडणूक काळात भरारी पथकांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांनी उत्तमपणे काम करावे, असे ते म्हणाले. निवडणूक काळात शांतता, सुरक्षा तसेच निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया चांगल्या पध्दतीने पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी आपआपल्या क्षेत्रात आवश्यक सर्व नियोजन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा
तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून त्यांनी बाबनिहाय तयारीची माहिती जाणून घेतली. आदर्श आचारसंहिता, मतदार जनजागृती, वाहन व्यवस्था, मतदान केंद्रांची तयारी, मतदान यंत्रे घेऊन जाणाऱ्या वाहनांचा मार्ग, साहित्य वाटप, मनुष्यबळ व्यवस्थापन आदींचा यावेळी त्यांनी आढावा घेण्यात आला.