पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

– वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात

– अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन

– राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन

– पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ

– ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ

वर्धा :- पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी येथे दिली.

पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला.

आजच्याच दिवशी 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनसाठी सुरू केलेल्या अभियानाची आठवण करुन देतानांच बापूजींची कर्मभूमी आणि विनोबांची साधनाभूमी असलेल्या वर्ध्यातून विकसित भारताची निर्मिती करण्याच्या आमच्या संकल्पास ऊर्जा मिळते, असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यासाठी आम्ही यामुळेच वर्ध्याची निवड केली. ही योजना केवळ एक सरकारी कार्यक्रम नसून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशात हजारो वर्षापासून असलेल्या कौशल्याचा वापर करण्याचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. इतिहासात आपल्या देशातील समृध्दीचा मोठा आधार पारंपरिक कौशल्य हाच होता. येथील वस्त्रोद्योग, शिल्पकला, धातूविज्ञान, अभियांत्रिकी अशा साऱ्याच बाबी जगात वैशिष्टपूर्ण होत्या. जगातील सर्वात मोठा वस्त्रनिर्माता भारतच होता. मात्र पारतंत्र्याच्या कालखंडात इंग्रजांनी स्वदेशी कौशल्य नष्ट केले. या पार्श्वभूमीवर गांधीजींनी वर्ध्यातूनच ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात बलुतेदारी समुहाची सातत्याने उपेक्षा झाली. त्यामुळेच प्रगती आणि आधुनिकतेत देशाची पिछेहाट झाल्याची खंत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

कारागिरांच्या पारंपरिक कौशल्याचा सन्मान, सामर्थ्य आणि या समाजसमूहाची समृध्दी ही या योजनेमागची मूळ भूमिका असल्याचे स्पष्ट करुन श्री. मोदी म्हणाले, देशातील सातशेहून अधिक जिल्हे, अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती तसेच हजारो स्थानिक नागरी संस्था या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. दहा लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असून आठ लाख शिल्पकारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातीलच साठ हजारांहून कारागिर समाविष्ट आहेत. त्यांच्या कामाला आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. साडेसहा लाख बलुतेदारांना आधुनिक साधने दिली गेली आहेत. या योजनेचा सर्वाधिक फायदा याच समाजसमूहांना होत आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात मोठ्या औद्योगिक विकासाची क्षमता असून त्यात वस्त्रोद्योग हा अग्रणी आहे. विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असुनही येथील शेतकऱ्यांची यापूर्वी उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करुन प्रधानमंत्री मोदी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथे टेक्सटाइल पार्कची निर्मिती झाली. आता अमरावती येथे होत असलेले पीएम मित्रा पार्क हे वस्त्रोद्योगास नवी झळाळी प्राप्त करुन देण्याच्या प्रयत्नातील पुढचे पाऊल आहे. फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन अशा सुत्रातून आमचे प्रयत्न सुरू असून विदर्भातील उच्च दर्जाच्या सूतापासून तयार होणारे कपडे परदेशात निर्यात होऊन येथील शेतकरी समृध्द होतील. अमरावतीच्या पार्कमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1 लाखाचा रोजगार उपलब्ध होईल. औद्योगिक विकासासाठी पुरक असणाऱ्या विविध पायाभूत सुविधांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विदर्भातील सिंचन विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा योजनेच्या अंमलबजावणीतून 10 लाख एकर क्षेत्र सिंचित होणार आहे. याशिवाय कांदा, सोयाबीन उत्पादकांनाही विविध निर्णयाच्या माध्यमातून सरकार मदत करत आहे, असे प्रधानमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा योजना महत्वाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशातील गरीब, वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणूक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यावेळी म्हणाले की, पीएम विश्वकर्मा ही योजना पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडविणारी आहे. त्यांना उच्च गुणवत्ता व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेला माल जागतिक बाजारपेठेत पाठवण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात 1 लाख 46 हजार कारागिरांची नोंदणी झाली आहे. कारागिरांना अत्याधुनिक साधनांसाठी 5 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्या उत्पादीत वस्तुंना मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. भारतातील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तुंच्या उत्पादनांचे प्रदर्शन वर्धा येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामिण कारागिरांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे मांझी यांनी यावेळी सांगितले.

देशातील सात पीएम मित्रा पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार उपलब्ध होईल. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांच्या विकासाचा विचार अद्यापपर्यंत कोणीही केला नाही, परंतू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा सारख्या योजनेच्या माध्यमातून बाजारपेठेला अनुकूल असलेल्या वस्तुंची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्य कारागिरांना उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ समाजातील शेवटच्या कारागिरापर्यंत पोहोचत आहे. बलुतेदार समाजसमुहाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी या योजनेमधून उपलब्ध झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या पार्कमुळे पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार असून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे प्रकल्प गतिमानतेने पूर्ण केल्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विक्रम केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. गडचिरोली येथे स्टील उद्योग तसेच महापे येथे सेमी कंडक्टर या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपुर्ण योगदान देईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कारागिरांना प्रमाणपत्र, धनादेशाचे वितरण

प्रधानमंत्र्यांनी कळ दाबून अमरावती येथील पीएम मित्र पार्क, राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांचे उद्घाटन केले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या 1 लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र तसेच 1 लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरातील 75 हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय डाक विभागाने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्र्यांनी केले.

सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चरख्याची प्रतिकृती तर केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती भेट देऊन प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. लघु, सुक्ष्म व मध्यम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परंपरागत ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकर्षक कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, प्रभारी विभागीय आयुक्त डॅा.विपीन ईटनकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनोज सौनिक यांनी स्वीकारला महारेराचा पदभार

Sat Sep 21 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी महारेराचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज मंत्रालयात सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, महारेराचे सदस्य महेश पाठक, माजी सदस्य एस. एस. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com