नागपूर :- पथ विक्रेत्यांच्या व्यवसायाला बळकटी प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजने अंतर्गत खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनषंगाने गुरुवार (ता. 14) रोजी पंजाब नॅशनल बँक विभागीय कार्यालय नागपूर येथे प्रधानमंत्री स्वनिधी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन, समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे व बँकेचे विभागीय प्रमुख – आशिष चतुर्वेदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबिरात बँकेद्वारे एकूण 636 प्रधानमंत्री स्वनिधी कर्जदारांना खात्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी पंजाब नॅशनल बँकेच्या या प्रयत्नाचे मनपा अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन यांनी कौतुक केले आणि या योजनेच्या लाभार्थ्यांनी वेळेवर हप्ते भरून दुसऱ्या आणि तिसऱ्या कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते उपस्थित काही अर्जदारांना त्यांच्या स्वीकृती पत्रे प्रदान करण्यात आली. बँकेचे विभागीय प्रमुख श्री.आशिष चतुर्वेदी यांनी कर्जदारांना प्रधानमंत्री स्वनिधी योजना व प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती दिली व ग्राहकांनी बँकेच्या UPI पेमेंट सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.