यवतमाळ :- सद्या कापुस विकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आल्यास त्वरीत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उपाययोजना खालील प्रमाणे आहे.
गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापनः मृद परिक्षणाच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करावा. नत्रयुक्त खताचा नाहक वापर करणे टाळावे. सर्वेक्षणासाठी प्रत्येकी हेक्टरी ४ ते ५ कामगंध सापळे लावावेत. हे सापळे पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दीड फुट उंचीवर लावावेत, दोन सापळ्यामधील अंतर ५० मीटर ठेवावे.
सापळ्यात अडकलेले पतंग वेळच्यावेळी नष्ट करावेत. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा १५०० पीपीएम ५० मि.लि. प्रति लिटर फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येताच बीव्हेरिया बेसियाना १.१५ टक्के डब्लु पी या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाची ५० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकावर प्रती झाड किमान १० ते १५ हिरवी बोंडे असल्यास आवश्यकतेप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून करावा. कापूस पीक डिसेंबर अखेरीस काढून टाकावे.
गुलाबी बोंड अळीचे रासायनिक व्यस्थापन : किडींच्या सर्वेक्षणाअंती ५-१० टक्के किडग्रस्त पात्या, फुले, बोंडे किंवा कामगंध सापळ्यात सरासरी ७ ते ८ नर पतंग सतत दोन ते तीन दिवस ही गुलाबी बोंड अळीची आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावरच कोणत्याही एका लेबल क्लेम निहाय शिफारशीत कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेप्रमाणे फवारणी करावी. फवारणीसाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा सामू ६ ते ७ दरम्यान असावा,
गुलाबी बोंडअळीकरिता केंद्रीय कीटकनाशक मंडळाने सूचविलेल्या मात्रांची फवारणी करावे. त्यात क्वीनालफॉस २० टक्के एएफ २५ मिली, स्पीनेटोरम ११.७० टक्के एससी ४.५ ते ९ मिली, इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ३.८ ते ४.४ ग्राम, इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के ईसी ५ ते १० मिली, इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के एससी ५ मिली, प्रोफेनोफॉस ५० टक्के अधिक फेनप्रोपाचीन ५ टक्के ईसी ३० मिली, इमामेक्टीन बेन्झोएट १.५ टक्के अधिक प्रोफेनोफॉस ३५ डब्ल्यूडीजी १४ ग्रॅम, इमामेक्टीन बेन्झोएट १.१ टक्के अधिक डायफेनथायूरॉन ३० टक्के एससी २० मिली, सीनट्रानीलीप्रोल ७.३ अधिक डायफेनथायूरॉन 36.4 टक्के एसी 12.5 मिली याप्रमाणे फवारणी करावी.
तसेच क्लोरोपायरीफॉस १६ टक्के अधिक अल्फा सायपरमेथ्रीन १ टक्का ईसी ३३ ते ५० मिली, फिप्रोनिल १० टक्के अधिक डायफेनथायूरॉन ३० टक्के डब्ल्यूडजी १५ ग्रॅम, फिप्रोनिल १५ टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड ५ टक्के एससी १२ मिली, क्लोरणट्रानीलिप्रोल ९.३ टक्के अधिक लम्बडा सायहलोथ्रिन ४.६ टक्के झेडसी ५ मिली, सायपरमेथ्रीन १० टक्के अधिक इंडोक्झाकार्ब १० टक्के एससी ५ ते १२.५ मिली, क्लोरपायरिफॉस ५० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ५ टक्के ईसी 10 ते 20 मिली, इंडोक्झाकार्ब १४.५० टक्के अधिक एसीटामीप्रीड ७.७० टक्के एससी 8 ते 10 मिली, फेनप्रोपाथ्रीन १० ईसी 10 मिली, फेनप्रोपाथ्रीन ३० ईसी ३ ते ३.४ मिली, सायपरमेथ्रीन १० ईसी ७.५ मिली, फेनव्हलरेट २० ईसी ५.५ मिली या प्रमाणे कोणत्याही एका कीटकनाशकाची आलटून पालटून आवश्यकता भासल्यास १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.