पणजी :- भक्ती किल्लेदारचे सुवर्ण पदक तसेच अनुज सरनाईक आणि ओमकार अभंग यांची रौप्य पदके हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारातील महाराष्ट्राच्या कामगिरीचे वैशिष्ट्य ठरले. रविवारी पिंच्याक सिल्याटच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली.
कॅम्पाल क्रीडानगरीत झालेल्या पिंच्याक सिल्याटमधील महिलांच्या ८५ ते १०० किलो ओपन-१ गटात महाराष्ट्राच्या भक्तीने अंतिम सामन्यात केरळच्या अथिरा एमएस हिचा पराभव केला. त्याआधी उपांत्य सामन्यात तिने उत्तर प्रदेशच्या शालिनी सिंगला नामोहरम केले.
पुरुषांच्या ८५ ते ९० किलो टँडिंग गटातील अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अनुजला मध्य प्रदेशच्या महेंद्र स्वामीकडून हार पत्करल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत अनुजने गोव्याच्या सागर पालकोंडावर विजय मिळवला.
पुरुषांच्या ७० ते ७५ किलो टँडिंग गटाच्या सुवर्ण पदकाच्या लढतीत महाराष्ट्राच्या ओमकार दिल्लीच्या सूरज कुमारकडून पराभूत झाला. उपांत्य सामन्यात ओमकारने जम्मू काश्मीरच्या मोहम्मद इम्रानला धूळ चारली.
नवख्या खेळात एकूण १७ पदकांसह वर्चस्व
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना ७ सुवर्ण, ५ रौप्य, ५ कांस्य अशी एकूण १७ पदकांची लयलूट केली. या संघाला सुहास पाटील (वरिष्ठ संघ) आणि अभिषेक आव्हाड (कनिष्ठ संघ) यांचे मार्गदर्शन लाभले, तर साहेबराव ओहोळ यांनी व्यवस्थापक पदाची जबाबदारी सांभाळली.