– मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती
नागपूर :- शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिका आग्रही आहे. शहरातील सर्व गणेश मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानगीसाठी होणारा त्रास कमी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेतर्फे गणेश मंडळांना सोयीस्कर अशी ऑनलाईन प्रणाली व दहाही झोन निहाय एक खिडकी व्यवस्था येत्या काही दिवसांमध्येच कार्यान्वित करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना घरबसल्या सर्व परवानगी मिळविता येणार आहे, अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत दिली.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात गणेशोत्सवासंदर्भात बुधवार (ता.३०) रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख महेश धामेचा, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितले की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार यावर्षी पी.ओ.पी. मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. येत्या गणेशोत्सवासाठी सर्व मूर्तिकार, कलावंतानी पर्यावरणपूरक मूर्तीची निर्मिती करण्याकरिता मनपाच्या झोन कार्यालयामार्फत नोंदणी/परवाना घेणे आवश्यक असून, गणेश मंडळांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकाद्वारा लवकरच गणेश मंडळांना सोयीस्कर व सुलभ अशी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व दहाही झोन निहाय एक खिडकी व्यवस्था असणार आहे. गणेश मंडळांना लागणारी झोन निहाय परवानगी, पोलीस विभागाची परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाची परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र आदी परवानगी या ऑनलाईन प्रणालीद्वारे सुलभरित्या मिळविता येणार आहे. असेही मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितले.
मातीच्या मूर्तींची स्थापना करा
गणेशोत्सव म्हटलं तर सर्वत्र उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते असे असताना नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, तसेच मातीच्या मूर्तीची स्थापना करावी असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी यावेळी केले.