महाराष्ट्र विधान परिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्र

नागपूर :-  महाराष्ट्र विधान परिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊ या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधान परिषद सभागृहात महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे योगदान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राजेंद्र गवई यांच्यासह विधान परिषद सदस्य, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, परिषद सभागृहामध्ये विचार मांडण्याची मुभा असते. जनतेला न्याय देणे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सभागृहात येतो. महाराष्ट्र सर्व क्षेत्रासोबतच संसदीय कार्यप्रणालीमध्येही अग्रेसर आहे. ऐतिहासिक वास्तूमध्ये होत असलेला आजचा हा शतक महोत्सवी कार्यक्रम ऐतिहासिक आहे. राज्याची संसदीय परंपरा ही वैभवशाली असून जगाने गौरवलेली आहे. या परंपरेमध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे संसदीय परंपरा समृद्ध करणारे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करायचे आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची बेरीज करु या. विदर्भातील जनतेला या अधिवेशाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी काम करू या. सर्वांनीच हे अधिवेशन गांभीर्याने घ्यावे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा ही आमची भावना आहे. विदर्भाला जोडणारे माध्यम हीच या अधिवेशनाची मोठी उपलब्धता असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, राज्याला महर्षी कर्वे, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या योगदानामुळेच राज्यात शिक्षण चळवळ यशस्वी झाली आहे. समाजप्रबोधनाची ही परंपरा जपण्याचे काम विधान परिषदेच्या माध्यमातून होत आहे. विधान परिषदेच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी लवकरच पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

विधान परिषदेचे महत्व सांगताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, परिषदेमुळे शिक्षक, पदवीधर, लेखक, कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडूंना प्रतिनिधित्व मिळाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे यांनी चर्चासत्राच्या कार्यक्रमास शुभेच्छा देताना या अधिवेशनाचे सर्वांनाच कुतुहल असल्याचे सांगितले.

यावेळी विधानपरिषद सदस्यांना तसेच विधान परिषदेतील वार्तांकनाबद्दल ज्येष्ठ पत्रकारांना पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पत्रकारांमध्ये लक्ष्मणराव जोशी, प्रकाश दुबे, तुळशिदास भगवंत (टी.बी.) गोल्हर, सुधीर पाठक, विनोद देशमुख, जोसेफ राव, विश्वास इंदुरकर, अविनाश पाठक, मोरेश्वर बडगे, प्रभाकर दुपारे, शैलेश पांडे, महेश उपदेव, प्रदीप मैत्र, चंद्रशेखर बोबडे, नितीन तोटेवार, मनोज चौबे, अजय मार्डीकर, विवेक जोशी, आनंद निर्बंध, भुपेंद्र सखाराम गणवीर, प्रकाश दुबे, आनंद भिसे, संजय तिवारी यांचा समावेश आहे.यावेळी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी, प्रकाश दुबे, प्रदीप मैत्र यांनी मनोगत व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वा. सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Fri Dec 8 , 2023
– प्रियांक खर्गे च्या विरोधात भाजपा तर्फे राज्यभर आंदोलन मुंबई :- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसकडून वारंवार अपमान होत असताना उद्धव ठाकरे हे गप्प बसून आहेत. काँग्रेसकडून सावरकरांचा केला जाणारा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपूर येथे केला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी केलेल्या सावरकरांच्या अवमानाच्या विरोधात नागपूर येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!