रुग्णसंख्येत वाढ ; जिल्हा प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचे निर्देश

-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत निर्बंध घालण्याचा निर्णय

 नागपूर  : वर्षाच्या शेवटी नागपूर जिल्ह्यामध्ये रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे आता कोविड निर्बंधासाठी पूर्वीप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रूपये, परवानगीपेक्षा अधिक गर्दी असणाऱ्या ठिकाणी आस्थापनांवर 10 हजार रुपये, मंगल कार्यालयात गर्दी दिसल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने नव्या आदेशात दिले आहेत.

नागपूर शहरात गेल्या आठवड्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे. 30 डिसेंबर रोजी  28 असणारी  संख्या,  31डिसेंबरला 90 झाली आहे. त्यामुळे आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, पोलीस उपायुक्त बसवेश्वर तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे याशिवाय अन्य विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी आर.विमला यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना देखील स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होत असून लग्नकार्य, कार्यक्रम, सोहळे, तेरवी या ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केलेल्या नव्या निर्देशानुसार विवाह प्रसंग मोकळ्या किंवा बंद जागेत कुठेही असले तरी ही संख्या 50 पेक्षा अधिक असता कामा नये. कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक मेळावा, कार्यक्रम किंवा नागरिकांचा जमाव बंद जागेमध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये आयोजित करतेवेळी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्ती पुरती मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अंतिम संस्काराकरीता उपस्थितांची कमाल संख्या वीस व्यक्ती पुरती मर्यादित असेल.

दंडात्मक कारवाई

आज काढण्यात आलेल्या आदेशात कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नियमाचे उल्लंघन केल्याच्या प्रत्येक प्रसंगी पाचशे रुपये दंड करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून मास्क न वापरणाऱ्यावर शहराप्रमाणे ग्रामीण भागातही दंड वसुलीला प्रारंभ करण्यात येणार आहे.

दुकाने, आस्थापना याठिकाणी ग्राहकांना

कोविड अनुरूप वर्तन करण्यास सांगणे अनिवार्य आहे. अशा आस्थापना दुकानांमध्ये कोविड वर्तनाचे पालन होत नसल्याचे निर्देश आल्यास अशा आस्थापना दुकानांवर दहा हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. ज्या व्यक्ती कोविड अनुरुप वर्तन करणार नाही. त्यांच्यावरही वेगळी कारवाई केली जाणार आहे.

मंगल कार्यालय, कार्यक्रम स्थळे, या ठिकाणी निर्देशीत पेक्षा अधिक जनसंख्या वा कोविड अनुरूप वर्तनाचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास अशा संस्था किंवा अस्थापना 50 हजार रुपये इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार अशा पद्धतीचा दंड भरणाऱ्या संस्थानला बंद करण्यात येईल.

टॅक्सी, खाजगी वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहन,कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरूप वर्तनात कसूर केल्यास प्रत्येक व्यक्तीला 500 रुपये इतका दंड करण्यात येईल. तसेच सेवा पुरविणारे वाहन चालक, मदतनीस, किंवा वाहन यांना देखील पाचशे रुपये इतका दंड करण्यात येईल. मालक, परिवहन एजन्सीला मात्र यासाठी 10 हजार इतका दंड करण्यात येईल, असे नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दोन डोस पूर्ण करा

रुग्ण संख्या वाढत असताना रस्त्यावरची गर्दी कमी होईल याकडे प्रत्येकाने लक्ष देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन डोस घेणे आवश्यक आहे. ज्यांनी एक घेतला असेल त्याने तातडीने आपला दोन डोस पूर्ण करावा, स्वतःला सुरक्षित करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय वाढती रुग्ण संख्या बघता सर्व प्रमुख हॉस्पिटल मधील पूरक यंत्रणा तयार ठेवण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहे.

-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्टेशनरी घोटाळ्यासंदर्भात सत्तापक्ष नेत्यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत

Sat Jan 1 , 2022
-महापौर दयाशंकर तिवारी यांचा महत्वपूर्ण निर्णय : सर्वसाधारण सभेमध्ये दिले निर्देश नागपूर : नागपूर महानगरपालिकेमधील स्टेशनरी घोटाळ्याच्या संदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मनपातील स्टेशनरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्याचे निर्देश त्यांनी शुक्रवारी (ता.३१) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये दिले विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आणि माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक विजय (पिंटू) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com