Ø कुरण विकासचा राज्यातला पहिलाच प्रयोग
Ø आसेगाव देवी येथे 5 एकरवर कुरण विकास
Ø जणावरांसाठी गावातच होणार वैरण उत्पादन
यवतमाळ :- पशुधन असलेल्या गावांमध्ये जनावरांसाठी उत्तम दर्जाचे वैरण उत्पादन व्हावे यासाठी शासनाच्यावतीने वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी वैरण विकासाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव देवी येथे कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड.निलेश हेलोंडे पाटील यांच्याहस्ते 5 एकर क्षेत्रावरील वैरण विकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
शासनाच्या गायरान जागेवर पशुधनासाठी उत्तम दर्जाचे वैरण उत्पादन करण्यासाठी कुरण विकास करण्याचे राज्य शासनाचे धोरण याहे, त्याअनुषंगाने मनरेगा, पशुसंवर्धन, कृषि व वनविभागाच्या समन्वयाने गावातील पशुधनासाठी वैरण उत्पादन करण्याबाबत शासनाने दि.7 जुलै रोजी स्वतंत्र शासन आदेश निर्गमित केला आहे. पशुधन असलेले प्रत्येक गाव चारा उपलब्धतेने समृद्ध करण्याचा शासनाचा मानस आहे.
जिल्ह्यात वैरण विकासासाठी वेगवेगळी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी बाभुळगाव तालुक्यातील मौजे आसेगाव देवी येथील गायरान क्षेत्र गट क्रमांक 263 मधील 5 हेक्टर क्षेत्रावर वैरण विकासाचा शुभारंभ कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अँड.निलेश हेलोंडे पाटील यांच्याहस्ते भूमीपूजन करून करण्यात आला.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.विजय राहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.क्रांती काटोले, सहायक आयुक्त डॉ.राजेंद्र अलोने, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.प्रशांत झाडे, डॅा.रविंद्र भांडेकर, डॅा.अशोक धुर्वे, कुरण विकास कार्यक्रमात महत्वाचा सहभाग असणारे आसेगावचे सरपंच सचिन चव्हाण, उपसरपंच निखिल वेळुकर, सदस्य सुभाष ताबडू, श्री.अजमिरे, ग्रामसेवक कावलकर, रोजगार हमी योजनेचे केळतकर तसेच कावलकर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरण विकास कार्यक्रम एक अभिनव उपक्रम असून भविष्यात येणाऱ्या चाराटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे, असे यावेळी मिशनचे अध्यक्ष ॲड.हेलोंडे यांनी सांगितले व यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच सुरु होणाऱ्या या प्रकल्पाचे कौतूक केले. त्यानंतर मिशनच्या अध्यक्षांनी आसेगाव देवी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला देखील भेट दिली. यावेळी सरपंच सचिन चव्हाण व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले व विविध विषयांवर चर्चा केली.