मुंबई :- एनसीसीमधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणे आवश्यक आहे. या दृष्टीने मुलींनी एनसीसी मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
‘एनसीसीच्या माध्यमातून कॅडेट मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उदघाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. ३० नोव्हेंबर) के सी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र एनसीसी संचालनालय व एचएसएनसी विद्यापीठ यांनी सयुक्तपणे चर्चासत्राचे आयोजन केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनसीसीच्या विस्ताराबाबत सूचित केले आहे. या दृष्टीने अधिक युवक युवतींनी एनसीसी मध्ये आपला सहभाग वाढवला पाहिजे असे सांगून एनसीसी मुळे शिस्तपालनाचे महत्व कळते व देशभक्तीची भावना वाढते असे राज्यपालांनी सांगितले.
शिस्त नसली तर यश मिळत नाही त्यामुळे युवकांनी शिस्त बाणवली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. युवक युवतींनी दिवसातील किमान १५ मिनिटे योग व ध्यानधारणेसाठी दिल्यास त्यांची एकाग्रता शक्ती वाढेल असे सांगताना युवकांनी मोबाईलवरील वेळ नियंत्रित ठेवला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
चर्चासत्राला एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह, एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी, सर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीन, महासंचालक सशस्त्र सैन्य दल वैद्यकीय महाविद्यालय, दिप्ती चावला, अतिरिक्त सचिव, संरक्षण मंत्रालय, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ हेमलता बागला, एनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग तसेच सैन्य दलातील अधिकारी, जवान व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.