– मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन
– अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिली स्पर्धेची संपूर्ण माहिती
– मनपात विविध मार्केट असोसिएशन प्रतिनिधींची बैठक
– स्पर्धेसाठी आज पासुन नोंदणीला सुरुवात
नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@२०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ मार्केट स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्वच मार्केट असोसिएशनला स्पर्धेत सहभाग घेणे अनिवार्य असून, स्पर्धेत सक्रियता दर्शवित स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मार्केट असोसिएशनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करतांना केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@२०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ मार्केट स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती सर्व मार्केट असोसिएशन पर्यंत पोहोचावी आणि स्पर्धेसंदर्भात त्यांच्या बहुमूल्य सूचना घेता याव्या, याकरिता मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभापती सभागृहात शहरातील विविध मार्केट संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, नागपूर@२०२५ चे समन्वयक निमेश सुतारीया, मनपाचे लोकेश बासनवार, रोहिदास राठोड, स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, तेजस्विनी महिला मंचच्या श्रीमती किरण मुंदडा, फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे विजय लिमये, जुई सहत्रबुद्धे, पुष्कर लाभे, निशा ठाकुर, शैफाली दुधबडे, मुकुल कोपजे, यांच्यासह सक्करदरा मार्केट असोसिएशन, जरीपटका मार्केट असोसिएशन, खामला मार्केट असोसिएशन, नेताजी मार्केट असोसिएशन, कॉटन मार्केट असोसिएशन, गांधीबाग मार्केट असोसिएशन, गोकुळपेठ, धरमपेठ मार्केट असोसिएशन, हॉकर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, मनपा स्वच्छता विभागाचे सर्व विभागीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी “स्वच्छ मार्केट स्पर्धेची” संपूर्ण माहिती दिली. स्पर्धेविषयी माहिती देत अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले की, नागपूर ही मध्य भारतातील महत्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळे मार्केट ही शहराची ओळख आहे.शहरातीय सर्व बाजार/व्यवसायिक/ मार्केट स्वच्छ व सुंदर बनविण्याकरीता स्वच्छ मार्केट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपले शहर,परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन कार्य करायला हवे आहे. नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ शहर साकारण्यासाठी मार्केट असोसिएशनने देखील पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन ही अतिरिक्त आयुक्त यांनी यावेळी केले.
शहरातील मार्केटचा विकास व सौंदर्यीकरण करणे हे या स्पर्धेचे मुख्य उदिष्ट आहे. स्पर्धेत स्वच्छता, कचरा वर्गीकरण, परिसरातील स्वच्छतेची स्थिती, सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करणे, विविध उपक्रम राबविणे आदी विविध मापदंडावर मूल्यमापन केले जाणार आहेत. १ फेब्रुवारी पासून या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु होणार असून, जून पर्यंत स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्व मार्केट असोसिएशनला या स्पर्धेत सहभाग घेणे अनिवार्य करण्यात आले असून, मनपाद्वारे स्पर्धेतील विजेत्यांना मार्केटच्या विकासासाठी विकास निधी दिला जाणार आहे. बैठकीत मनपाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी मनपाद्वारे सुरु असलेले विविध स्वच्छता उपक्रमाची माहिती दिली.
*स्पर्धेचा कालावधी, गुणांकन आणि पुरस्कार*
१. स्पर्धेसाठी १ फेब्रुवारीपासून ते १५ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. नोदंणी अर्ज एस बी एम कक्षात मनपा मुख्यालयात सिव्हिल लाईन्स येथे कार्यालयीन वेळेत जमा करावे.
२. १५ ते २९ फेब्रुवारी पर्यंत बेसलाऊन सर्वेक्षण करण्यात येईल. या माध्यमातून मार्केटचे निर्धारित मापदंडानुसार मूल्यांकन होईल.
३. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या चमूमार्फत मूल्यांकन करण्यात येईल.
४. १ ते ३१ मार्च दरम्यान स्पर्धेचा प्रथम टप्पा राहील व या टप्याचे मुल्यांकन 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान करण्यात येईल.
५. १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान स्पर्धेचा प्रथम टप्पा आणि या टप्याचे मुल्यांकन 1 जून ते 15 जून दरम्यान करण्यात येईल.